अखेर अनुकंपा पदभरती तिढा सुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:27 AM2021-07-04T04:27:19+5:302021-07-04T04:27:19+5:30
वाशिम :- जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेमध्ये बऱ्याच दिवसांपासून रेंगाळत पडलेल्या अनुकंपा पदभरतीचा अखेर तिढा सुटला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने ...
वाशिम :- जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेमध्ये बऱ्याच दिवसांपासून रेंगाळत पडलेल्या अनुकंपा पदभरतीचा अखेर तिढा सुटला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने ६, तर जिल्हा परिषदेमध्ये ४६ अनुकंपाधारकांना नोकरीत सामावून घेतले आहे.
जिल्हा परिषदेमध्ये २०१४ पासून अनुकंपा नियुक्त्या रखडलेल्या होत्या. अनुकंपा पदभरती तत्काळ करण्यात यावी, यासाठी अनुकंपाधारक संघाने वेळोवेळी पाठपुरावा करून दोन वेळा आमरण उपोषण केले. अखेर, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी सामायिक यादीतील तीन व महसूल यादीतील तीन अशा सहा अनुकंपाधारकांना नोकरीत सामावून घेतले, तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी जिल्हा परिषदेच्या यादीतील ४५ अनुकंपाधारकांना नोकरीत सामावून घेण्याचे आदेश १ जुलै रोजी दिले आणि अखेर अनुकंपाधारक संघाच्या लढ्याला यश मिळाले असल्याची माहिती अनुकंपाधारक संघाचे जिल्हाध्यक्ष किशोर अवचार यांनी दिली.
शासनसेवेत रुजू असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्याच्या जागेवर एका वारसाला नोकरीत सामावून घेण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र, प्रशासकीय उदासीन धोरणामुळे अनुकंपा पदभरती करण्यासाठी दिरंगाई केली जाते. अनुकंपा पदभरती तत्काळ करण्यासाठी अनुकंपाधारक संघ राज्यभरात आंदोलन करतो. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालयात रिक्त पद असतानासुद्धा पदभरती करण्यासाठी दिरंगाई केली जात असल्याचे पाहून अनुकंपाधारक संघाचे प्रदेशाध्यक्ष पंकज गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक सचिव डिगांबर माणमोठे, जिल्हाध्यक्ष किशोर अवचार यांच्या नेतृत्वात वेळोवेळी पाठपुरावा करून आंदोलने केली, तर दोन वेळा आमरण उपोषण करण्यात आले होते. याची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने ६ व जिल्हा परिषद कार्यालयाने ४५ अनुकंपाधारकांना नोकरीत सामावून घेतले आहे. तर, उर्वरित अनुकंपाधारकांनासुद्धा लवकरात लवकरच नोकरीस लागण्यासाठी अनुकंपाधारक संघ प्रयत्न करत आहे, असे अनुकंपाधारक संघाचे प्रदेशाध्यक्ष पंकज गाडेकर यांनी सांगितले. नोकरीस लागलेल्या अनुकंपाधारकांचा प्रदेशाध्यक्ष पंकज गाडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अनुकंपाधारक संघाचे प्रदेशाध्यक्ष पंकज गाडेकर, संस्थापक सचिव डिगांबर माणमोठे, जिल्हाध्यक्ष किशोर अवचार, भारत साबळे, दिनेश घनघाव, अभिजित निंबेकर, पुरुषोत्तम जाधव यांच्यासह लागलेले अनुकंपाधारक उपस्थित होते.