वाशिम जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांना गेल्या तीन वर्षांपासून शुल्क परतावा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 03:06 PM2017-12-26T15:06:06+5:302017-12-26T15:11:43+5:30
वाशिम : इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव कोट्यातून मोफत प्रवेश देणाऱ्या जिल्ह्यातील अनेक शाळांना गेल्या तीन वर्षांपासून शुल्क परतावा मिळालेला नाही.
वाशिम : इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव कोट्यातून मोफत प्रवेश देणाऱ्या जिल्ह्यातील अनेक शाळांना गेल्या तीन वर्षांपासून शुल्क परतावा मिळालेला नाही. थकीत असलेली ही रक्कम दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक असून या प्रश्नाकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने संस्थाचालक आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची माहिती ‘मेस्टा’ संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष गडेकर यांनी मंगळवारी दिली.
ज्यावर्षी विद्यार्थ्यांना २५ टक्के कोट्यातून शाळेत मोफत प्रवेश देण्यात आला, त्याचवर्षी शासनाकडून शुल्क परतावा मिळणे क्रमप्राप्त आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून यासंदर्भात कमालीची उदासिनता बाळगली जात आहे. गडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०१४-१५ मध्ये जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना २५ टक्के कोट्यातून प्रवेश देण्यात आला. त्यापोटी शासनाकडून ८० लाख मिळणे अपेक्षित होते. २०१५-१६ मधील ही रक्कम एक कोटी रुपये असून २०१६-१७ मधील १ कोटी रुपये बाकी आहेत. असे असतानाही जिल्ह्यातील संस्थाचालकांनी कुठलीच तक्रार न ठेवता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जोपासत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिला. ही बाब शासनाने लक्षात घेवून प्रलंबित असलेली शुल्क परताव्याची रक्कम विनाविलंब अदा करावी, अशी संस्थाचालकांची मागणी असल्याचे गडेकर यांनी सांगितले.