शैक्षणिक सहलींच्या नियमांना वाशिम जिल्ह्यातील इंग्रजी शाळांकडून ‘कोलदांडा’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 03:09 PM2018-01-08T15:09:18+5:302018-01-08T15:11:06+5:30
वाशिम: विद्यार्थ्यांची कुठेही शैक्षणिक सहल काढायची असल्यास शालेय शिक्षण विभागाने त्यासाठी विविध स्वरूपातील नियम घालून दिले आहेत. मात्र, त्याची अवहेलना करित जिल्ह्यातील बहुतांश इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांनी पुर्वप्राथमिक अर्थात नर्सरीपासून यूकेजीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली आयोजित करणे सुरू केले आहे.

शाळांना सहल काढायची झाल्यास ती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसव्दारे अथवा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मान्यताप्राप्त वाहनातून काढणे बंधनकारक आहे. याशिवाय पालकांची आणि शिक्षण विभागाची परवानगी त्यासाठी घेणे देखील आवश्यक आहे. किती किलोमिटर अंतराची शैक्षणिक सहल आहे आणि त्यासाठी किती पैसे लागतील, याचाही हिशेब संबंधित शाळांनी ठेवून तो शिक्षण विभागाकडे सादर करण्याचा नियम आहे. मात्र, त्याची पायमल्ली करित जिल्ह्यातील बहुतांश इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांनी चक्क खासगी वाहनांव्दारे तद्वतच शिक्षण विभागाची कुठलीही परवानगी न घेता सहली काढण्याचा सपाटा लावला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष पुरवावे, अशी मागणी होत आहे.
विद्यार्थ्यांची सुरक्षिता अत्यंत महत्वपूर्ण आहे. सहलीदरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठीच शालेय शिक्षण विभागाने महत्वपूर्ण नियम घालून दिले आहेत. त्याचे पालन करणे सर्व शाळांना बंधनकारक आहे. ज्या शाळा नियम तोडून सहली काढत असतील, त्याची चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल.
- अंबादास मानकर
शिक्षणाधिकारी, प्राथमिक (जि.प., वाशिम)