शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या; कृषी अधिकाऱ्यांनी दिल्या सूचना
By संतोष वानखडे | Published: May 17, 2023 06:08 PM2023-05-17T18:08:22+5:302023-05-17T18:08:49+5:30
वाशिम येथे आयोजित खरीप हंगामपूर्व प्रशिक्षणात कृषी अधिकाऱ्यांनी कृषी सेवा केंद्र संचालकांना मार्गदर्शन केले.
वाशिम: शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन मागणीनुसार शेतकऱ्यांना रास्त भावात दर्जेदार कृषी निविष्ठांचा पुरवठा करावा, अशा सूचना कृषी अधिकाऱ्यांनी कृषी सेवा केंद्र संचालकांना बुधवारी दिल्या. वाशिम व मालेगाव पंचायत समितीच्या कृषी विभागातर्फे १७ मे रोजी वाशिम येथे आयोजित खरीप हंगामपूर्व प्रशिक्षणात कृषी अधिकाऱ्यांनी कृषी सेवा केंद्र संचालकांना मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणाला कृषि विकास अधिकारी गणेश गिरी, उपविभागीय कृषि अधिकारी निलेश ठोंबरे, मोहीम अधिकारी चंदू भागडे वाशिम व मालेगाव पंचायत समितीचे कृषी अधिकारी रमेश भद्रोड, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक किशोर सोनटक्के, वाशिम तालुका कृषि अधिकारी उमेश राठोड, मालेगाव तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण सावंत, कृषी व्यवसायिक संघटनेचे माफदा संचालक नितीन पाटणी, संघटनेचे प्रतिनिधी गजानन गावंडे, अशोक नवघरे यांच्यासह वाशीम व मालेगाव तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांचे संचालक उपस्थित होते. जिल्ह्याच्या मागणीनुसार बियाणे आणि खते उपलब्ध होत असून, शेतकऱ्यांची गैरसोय किंवा फसवणूक होणार नाही, याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी अशा सूचना कृषी अधिकाऱ्यांनी विक्रेत्यांना दिल्या. येत्या खरीप हंगामात नॅनो युरिया प्रमाणेच नॅनो डीएपी बाजारात उपलब्ध झाले असून त्याबाबत सर्व संचालकांना सागर मेहेत्रे यांनी मार्गदर्शन केले. नॅनो डीएपी बाबत सर्व विक्रेत्यांनी प्रचार व प्रसार करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन कृषि विकास अधिकारी गणेश गिरी यांनी केले आहे.