स्वयंसेवकांनी पावसातही राखला उत्साह
By Admin | Published: September 26, 2016 02:37 AM2016-09-26T02:37:50+5:302016-09-26T02:37:50+5:30
वाशिम येथे सकल मराठा समाजाचा मूक मोर्चा; व्यापा-यांनी पाळला स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद.
वाशिम, दि. २५- मराठा बांधवांचा मूक मोर्चा यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती या मोर्चाची शिस्त ठेवणार्या स्वंयसेवकांनी प्रत्येक चौकात उभे असलेले हे स्वंयसेवक मोर्चात सहभागी बांधवांना मार्गदर्शन करीत होते. मोर्चात सहभागी महिला भगिनी आणि पुरुष बांधवांनीही त्यांना सहकार्य केले. अशात दुपारी दीड वाजताच्या सुमारास रिमझीम पावसाला सुरुवात झाली. जवळपास दोन तास ही रिमझीम सुरूच होती. या पावसातही स्वंयसेवकांनी आपला उत्साह न हरविता जबाबदारी चोखपणे पार पाडली.
*विराट मोर्चात विद्यार्थिनींचा लक्षणीय सहभाग..
सकल मराठा क्रांती मूक मोर्चात विद्यार्थिनींचा लक्षणीय व उत्स्फुर्त सहभाग दिसून आला. अनेक शाळांमधील विद्यार्थिनींनी शालेय गणवेशनात येऊन शिस्तिचे दर्शन घडविले. विविध घोषवाक्य लिहिलेले फलक हातात घेऊन विद्यार्थिनींनीदेखील सकल मराठा समाजाच्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
*वकिल संघटना अग्रस्थानी
कृषी उत्पन्न बाजार समिती येथून स्थानिक शिवाजी चौकात सकल मराठा क्रांती मूक मोर्चाचे आगमन झाल्यानंतर, महिलांच्या रांगेनंतर वकिल संघटना अग्रस्थानी असल्याचे दिसून आले. न्यायालयीन कामकाजाच्या दिवशी असणारा पोषाख परिधान करून रविवारच्या विराट मोर्चात वकिल बांधवही मोठय़ा संख्येने सहभागी झाले. कोपर्डीतील हत्याकांडाचा निषेध, या हत्याकांडातील नराधमांना फाशी द्या, असे घोषवाक्य लिहिलेले फलक वकिल बांधवांनी हाती घेतले होते.
*नगर परिषदेची चोख व्यवस्था
सकल मराठा क्रांती मूक मोर्चा शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडावा म्हणून यासाठी करून वाशिम नगर परिषदेने चोख व्यवस्था करण्यात आली होती. नगर परिषदेने सर्वच मार्गांची निट साफसफाई केली. नाल्या साफ केल्या, तसेच मोर्चातील बांधवांना नाल्यातील दूर्गंधीमुळे निर्माण होणारे जिवाणू आणि डासांमुळे त्रास होऊ नये म्हणून रस्त्याच्या कडेला नाल्यांच्या काठावर बीएससी पावडर पसविले होते. त्याशिवाय काही मुख्य चौकात पृष्ठाच्य कचरा पेट्या ठेवल्या होत्या. रस्त्यावर साचणारा कचरा त्वरीत उचलण्यासाठी काही सफाई कामगार ठिकठिकाणी तैनात करून घंटागाड्याही विविध चौकात उभ्या ठेवण्यात आल्या होत्या.
*सुरुवात आणि शेवट जिजाऊ वंदनेने
कोपर्डी घटनेचा निषेध, तसेच इतर सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यासह इतर विविध मागण्यांसाठी वाशिम शहरात आयोजित भव्य मोर्चाचा प्रारंभ राष्ट्रमाता जिजाऊ वंदनेने स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये करण्यात आला आणि जिल्हा क्रीडा संकुलावर जिजाऊ वंदना घेऊनच या मोर्चाचा समारोप करण्यात आला.
*श्रद्धांजलीच्या वेळी मार्गस्थ मोर्चेकरी स्तब्ध !
कोपर्डी घटनेत बळी गेलेल्या मुलीला तसेच उरी येथील आतंकवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना जिल्हा क्रीडा संकुलावर श्रद्धांजली वाहण्यात आली. क्रीडा संकुलावर श्रद्धांजली अर्पण करीत असताना, बसस्थानक, आंबेडकर चौक, शिवाजी चौक ते पाटणी चौकादरम्यान मार्चेकर्यांची भलीमोठी रांग होती. जथ्थेच्या जथ्थे शिवाजी चौकातून पाटणी चौक मार्गे क्रीडा संकुलाकडे मार्गक्रमण करीत होते. ध्वनी क्षेपकावरून श्रद्धांजलीपर घोषणा झाली आणि मार्गस्थ मार्चेकर्यांनी आपापल्या जागेवर स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहली.