वाशिम येथे हरी व्याख्यानमाला उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:49 AM2021-02-17T04:49:48+5:302021-02-17T04:49:48+5:30
हरिभाऊ प्रतिष्ठानतर्फे आयोजित या व्याख्यानमालेचे यंदा एकविसावे वर्ष होते. व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प विनोदी लेखक नरेंद्र इंगळे (अकोट) यांनी गुंफले. ...
हरिभाऊ प्रतिष्ठानतर्फे आयोजित या व्याख्यानमालेचे यंदा एकविसावे वर्ष होते. व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प विनोदी लेखक नरेंद्र इंगळे (अकोट) यांनी गुंफले. यावेळी त्यांनी ‘विनोद : एक जीवन ऊर्जा’ असा विषय घेऊन श्रोत्यांना खळखळून हसविले. ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता बुलडाणा येथील प्राचार्य डॉ. गोविंद गायकी यांनी ‘हसत-खेळत कविता!’ हा विषय फुलविला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक डॉ. सदानंद देशमुख यांनीही साहित्याच्या निर्मिती प्रक्रियेविषयी मौलिक माहिती देत स्वानुभव कथन केले. यावर्षीचा वाशिम जिल्हा समाजभूषण पुरस्कार बोरगाव, ता. मालेगाव येथील शेतकरी कार्यकर्ते वसंता लांडकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
हरी व्याख्यानमालेत पहिले दोन दिवस व्याख्याने झाल्यानंतर तिसरा दिवस स्व. द. चिं. सोमण स्मृती व्याख्यानमालेचा होता. विदर्भ साहित्य संघ शाखा वाशिमतर्फे आयोजित या व्याख्यानमालेचे हे आठवे वर्ष होते. पैठण येथील व्याख्यात्या डॉ. ऊर्मिला चाकूरकर यांनी ‘जीवन एक प्रवास’ असा विषय मांडताना श्रोत्यांना तासभर खिळवून ठेवले. कार्यक्रमासाठी हरिभाऊ प्रतिष्ठानचे पदाधिकारी, विदर्भ साहित्य संघ शाखा वाशिमची कार्यकारिणी आणि सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.