उद्योजकांना कुशल मनुष्यबळ अन् कामगारांना काम मिळेना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:42 AM2021-05-13T04:42:02+5:302021-05-13T04:42:02+5:30
वाशिम : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र चिंतेचे व अस्थिरतेचे वातावरण आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध ...
वाशिम : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र चिंतेचे व अस्थिरतेचे वातावरण आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू असल्याने याचा फटका उद्योग, व्यापार क्षेत्राला बसत आहे. उद्योग क्षेत्राला कुशल मनुष्यबळ, कच्चा मालाचा तुटवडा जाणवत असल्यामुळे काहीचे मंदीचे सावट आहे.
औद्योगिक, व्यापार आदी क्षेत्रात वाशिम जिल्हा अगोदरच मागासलेला म्हणून ओळखला जातो. वाशिम शहरानजीकच्या एमआयडीसी क्षेत्राचा अपवाद वगळता जिल्ह्यात उर्वरित ठिकाणच्या एमआयडीसीला विकासाचीच प्रतीक्षा आहे. वाशिम येथील एमआयडीसीमध्ये २० ते २५ छोट्या, मोठ्या उद्योगाचा अपवाद वगळता अन्य मोठे उद्योग सुरू होऊ शकले नाहीत. कारंजा येथे सूतगिरणी व दाल उद्योग आहे. रिसोड येथे एका सूतगिरणीचा अपवाद वगळता उर्वरित मोठा उद्योग नाही. अमानी येथील एमआयडीसी क्षेत्रात तीन, चार उद्योगाचा अपवाद वगळता अन्य उद्योग सुरू झाले नाहीत. त्यातच गतवर्षी साधारण मार्चपासून उद्योगांना मोठ्या प्रमाणात विविध संकटांना सामोरे जावे लागले आहे. यंदा दुसऱ्या लाटेमध्येदेखील जनजीवन प्रभावित झाले असून, उद्योगधंदेही ठप्प झाले. जिल्ह्यात सध्या कडक निर्बंध असल्याने उद्योगधंदेही बंद आहेत. कामगारांमध्ये अस्वस्थता आहे. परप्रांतीय कामगार गावी निघून गेले आहेत, तर स्थानिक कामगारही भीतीपोटी येण्याचे टाळत आहेत. दुसरीकडे अकुशल कामगार कामांच्या मागणीसाठी येतात; परंतु कुशल कामगारांची गरज असल्यामुळे अकुशल कामगारांना स्वीकारले जात आहे. या सर्व अडचणींमुळे उद्योगांची गती मंदावली असून, बाजारपेठा बंद असल्यामुळे उद्योजक अडचणीत आले आहेत.
चौकट....
कच्चा मालाची भाववाढ उद्योगांच्या मुळावर
कच्चा मालाच्या अडचणीला व्यापाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. जवळपास २० ते ३० टक्क्यांपर्यंत कच्चा मालाचे भाव वाढले आहेत. अगोदर हा माल उद्योगांना उधारीवर मिळत होता; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अस्थिरता असल्यामुळे आता उधारीवर कच्चा माल दिला जात नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. या दिवसांत अर्थचक्र थांबल्यामुळे उद्योगांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
उद्योजकांच्या प्रतिक्रिया ..
कच्चा मालाचे भाव वधारले
अलीकडे कच्चा मालाच्या भावात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजारपेठा बंद असल्यामुळे अर्थसाखळी विस्कळीत झाली आहे. सध्याच्या काळात पहिल्यासारखे कोणी उधारीवर कच्चा माल देत नाही. त्यामुळे अडचणीवर मात करून उद्योग सुरू ठेवावा लागतो.
- आनंद चरखा, उद्योजक.
००
कुशल मनुष्यबळाची टंचाई
सध्या कुशल मनुष्यबळाची मोठी अडचण असून, कडक निर्बंधामुळे उद्योगक्षेत्रही प्रभावित झाले आहे. बाजारपेठा बंद असल्यामुळे उत्पादन सुरू ठेवूनही उपयोग होत नाही. त्यामुळे काही प्रमाणात व्यापाराला सूट मिळणे अपेक्षित आहे.
- विशाल मालपाणी, उद्योजक.
००००
उद्योगाला उतरती कळा
कोरोनामुळे उद्योग क्षेत्राला जणू उतरती कळा लागत आहे. पहिल्या लाटेतून सावरत नाही, तेच कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कडक निर्बंध लागू आहेत. अत्यावश्यक कारणाशिवाय परजिल्ह्यात जाता येत नाही. उद्योगक्षेत्राला उभारी मिळणे गरजेचे आहे.
- पंजाबराव अवचार,उद्योजक.
०००
कामगारांच्या प्रतिक्रिया..................
उद्योगधंदे सुरू केव्हा होतील?
कोरोनामुळे कामगारांवर वाईट दिवस आले आहेत. उद्योगक्षेत्र प्रभावित झाल्याने त्याचा फटका कामगारांनादेखील बसत आहे. परप्रांतीय मजूर घराकडे परतत आहेत तर स्थानिक कामगारांना रोजगार मिळत नाही. शासनाने कामगारांसाठी एखादे पॅकेज जाहीर करणे आवश्यक ठरत आहे. काम नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? असा प्रश्न आहे.
-आनंद कोल्हे, कामगार.
उपासमारीची वेळ आली
कोरोनामुळे अलीकडे कामगार कमी केले जात आहेत. यामुळे वेतनही कमी होते. त्यामुळे कुटुंबाचा गाडा हाकावा कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. काम करण्याची तयारी असलेले अनेक नवखे कामगार कामाच्या मागणीसाठी येतात; पण पूर्वीचेच कामगार कमी केले असल्यामुळे त्यांना काम दिले जात नाही.
- योगेश हिंगळकर, कामगार.