विद्यार्थ्यांच्या अर्जात त्रूटी; शिष्यवृत्ती वितरणात व्यत्यय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 12:41 PM2020-08-25T12:41:04+5:302020-08-25T12:41:18+5:30
संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात अर्जातील त्रूटींनी व्यत्यय आणला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क तसेच इतर आॅनलाईन झालेल्या योजनांतर्गत शैक्षणिक सत्र २०१९-२० मधील रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात अर्जातील त्रूटींनी व्यत्यय आणला आहे. सर्व संबंधित महाविद्यालयांनी आॅनलाईन पद्धतीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अर्ज क्रमांक नमूद करून अर्ज तपासून घ्यावे, अशा सूचना समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी २५ आॅगस्ट रोजी दिल्या. अर्जातील त्रूटीमुळे शिष्यवृत्ती रखडत असल्याने त्रूटीची पूर्तता होणे गरजेचे आहे.
अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजना व इतर आॅनलाईन झालेल्या विविध योजनेंतर्गत सन २०१९-२० मध्ये विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जांवर कार्यवाही करण्यासाठी १७ जुलै २०२० पर्यंत मुदत मिळाली होती. या अर्जावर वाशिमचे समाजकल्याण सहाय्यक आयुक्त केदार यांनी आॅनलाईन प्रणालीद्वारे मान्यता प्रदान केल्यानंतर आयुक्तालय स्तरावरून त्यांचे देयक तयार करणे आणि कोषागारातून देय असलेली रक्कम पारित करून महाडीबीटी पोर्टलच्या ‘पूल बँक’ खात्यामध्ये जमा करण्यात आली. ही रक्कम ‘पीएफएमएस’ या केंद्रीभूत वितरण प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयांच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा होणे अपेक्षित आहे. परंतू पीएफएमएस प्रणालीमधून रक्कम वितरण करण्यापूर्वी लाभार्थ्यांचा आधार व बँक खात्याची पडताळणी ‘एनपीसीआय’ या केंद्रीभूत पडताळणी प्रणालीद्वारे केली जाते. या पडताळणी प्रक्रियेस विलंब होत असल्याचे निदर्शनास आल्याने समाजकल्याण आयुक्तालय स्तरावरून माहिती व तंत्रज्ञान संचालनालयास तसेच राज्यस्तरावरील पीएफएमएस व एनपीसीआय कार्यालयांकडे पाठपुरावा सुरु आहे, असे केदार यांनी सांगितले.