हृदयरोग, मधुमेह असला तरी कोरोना लस घ्यायलाच हवी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:45 AM2021-03-09T04:45:28+5:302021-03-09T04:45:28+5:30
वाशिम : शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यानंतर १ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ, ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्तांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याला प्रारंभ झाला ...
वाशिम : शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यानंतर १ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ, ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्तांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याला प्रारंभ झाला असून, जिल्ह्यातील सहा केंद्रांमध्ये ९० जणांना लस देण्यात आली.
१ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ व ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्तांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याला देशभरात प्रारंभ झाला. जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, कारंजा उपजिल्हा रुग्णालय आणि रिसोड, मानोरा, मंगरूळपीर व मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालय तसेच आरोग्यवर्धिनी केंद्रातही लसीकरणाची सुविधा उपलब्ध केली आहे. याशिवाय काही खासगी दवाखान्यांमध्येदेखील कोरोना लस दिली जात आहे. हृदयरोग, किडनीरोग, मधुमेह, एखाद्या औषधीची ॲलर्जी, किंवा अन्य आजार असतील तर या आजाराची माहिती लस घेण्यापूर्वी संबंधित ज्येष्ठांनी डाॅक्टरांना देणे आवश्यक आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर काही वेळ डाॅक्टरांच्या निगराणीखाली राहावे. एखाद्या औषधीची लर्जी असल्यास कोणत्या आैषधीपासून ऑलर्जी आहे, याची माहिती संबंधित डाॅक्टरांना दिल्यानंतर सुरक्षितपणे लसीकरण करणे सुलभ होईल, असे तज्ज्ञ डाॅक्टरांचे म्हणणे आहे.
हृदयरोग, मधुमेह, किडनी, ॲलर्जी, उच्च रक्तदाब आदी आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस ही फायदेशीर असून, कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता ज्येष्ठांनी लस घ्यावी, असा सल्ला शहरातील तज्ज्ञ डाॅक्टरांनी दिला आहे.
००
कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव म्हणून प्रतिबंधक लस ज्येष्ठांना दिली जात आहे. ही लस पूर्णत: सुरक्षित आहे. मधुमेह, हृदयरोग किंवा अन्य आजार असलेल्या ज्येष्ठांनी कोणताही गैरसमज न करता कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी.
- डाॅ. अमित राठी
एम.डी. फिजिशियन, वाशिम
०००
हृदयरोग असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीपासून कोणताही धोका नाही. याउलट त्यांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून फायदाच आहे. एखाद्याला आधीपासून ॲलर्जी असेल तर संबंधितांनी तशी माहिती डाॅक्टरांना द्यावी.
- डाॅ. सिद्धार्थ देवळे
हृदयरोगतज्ज्ञ, वाशिम
०००
कोरोना लस ही सर्वांगाने सुरक्षित आहे. लस घेतल्याने मूत्रपिंडावर कुठलाही ‘साईड इफेक्ट’ नाही. विशेषत: किडनी रोगी, ‘डायलिसीस’वर असलेले आणि ‘किडनी ट्रान्सप्लान्ट’ रुग्णांनी आवर्जून ही लस घेऊन सुरक्षित व्हावे.
- डॉ. पंकज गोटे,
किडनीरोग तज्ज्ञ, वाशिम
००
मधुमेह किंवा अन्य आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लस सुरक्षित व फायदेशीर आहे. कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता, गैरसमज न बाळगता ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी.
- डॉ. सचिन पवार,
मधुमेहतज्ज्ञ, वाशिम
००
कोरोना प्रतिबंधक लस ही पूर्णत: सुरक्षित आहे. हृदयरोग, मधुमेह किंवा अन्य आजार असलेल्या ज्येष्ठ महिलांनीदेखील कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी.
- डॉ. शुभांगी साबू,
स्त्रीरोगतज्ज्ञ, वाशिम
००००