दहावीतही मुलीच हुश्शार; जिल्हा सलग तिसऱ्यांदा विभागात अव्वल
By दिनेश पठाडे | Published: May 27, 2024 01:26 PM2024-05-27T13:26:29+5:302024-05-27T13:26:38+5:30
वाशिम जिल्ह्याचा निकाल ९६.७१ टक्के
वाशिम : इयत्ता बारावी परीक्षेप्रमाणे दहावी परीक्षेच्या निकालातही मुलींनी अग्रक्रम प्राप्त केला आहे. अमरावती विभागात वाशिम जिल्ह्याने सलग तिसऱ्या वर्षी अव्वल येण्याचा बहुमान मिळवला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाने सोमवारी(२७ मे) रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर केला आहे. अमरावती विभागातील अकोला जिल्ह्याचा निकाल ९६.४६ टक्के, अमरावती ९४.६१, बुलढाणा ९५.९५, यवतमाळ ९५, आणि वाशिम जिल्ह्याचा निकाल ९६.७१ टक्के लागला. विभागातील पाच जिल्ह्याच्या तुलनेत वाशिम तालुका अव्वल ठरला.
वाशिम जिल्ह्यात इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी १९ हजार ७६५ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. प्रत्यक्षात १९ हजार ६४१ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १८ हजार ९९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षा दिलेल्या ११०७९ मुलांपैकी १० हजार ६०५ मुले उत्तीर्ण झाले असून त्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.७२ टक्के आहे. तर ८ हजार ५६२ मुलींपैकी ८ हजार ३६१ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींचे उत्तीर्णचे प्रमाण ९८ टक्के आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्णतेची टक्केवारी २.२८ टक्के अधिक आहे.
जिल्ह्याच्या निकालात रिसोड तालुका अग्रस्थानी
वाशिम जिल्ह्याचा तालुकानिहाय निकाल बघितला तर यामध्ये रिसोड तालुका अग्रस्थानी आहे. या तालुक्याचा निकाल ९८.३६ टक्के असा लागला आहे. मानोरा तालुक्याचा निकाल ९७.८३, मालेगाव ९७.१४, वाशिम ९६.०३, कारंजा ९५.९२ आणि मंगरुळपीर तालुक्याचा सर्वात कमी ९५.०१ टक्के निकाल लागला आहे