दहावीच्या परीक्षेतही मुलीच टाॅपर; जिल्हा विभागात ठरला अव्वल! ९७ शाळांचा निकाल १०० टक्के
By सुनील काकडे | Published: June 2, 2023 03:35 PM2023-06-02T15:35:51+5:302023-06-02T15:36:30+5:30
रिसोड जिल्ह्यात सर्वाधिक पुढे
वाशिम : यंदा २५ मे रोजी १२वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी मुलांच्या तुलनेत अधिक राहिली. शुक्रवार, २ जून रोजी जाहीर झालेल्या दहावी परीक्षेच्या निकालातही तेच चित्र कायम राहत मुलींनी अग्रक्रम प्राप्त केला आहे. विशेष बाब म्हणजे अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांच्या यादीत गतवर्षीप्रमाणे यंदाही वाशिमने प्रथम क्रमांकावर येण्याचा बहुमान प्राप्त केला. ९७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला, हे विशेष.
वाशिम जिल्ह्यातील ३३० शाळांमधील १० हजार ६६३ मुले आणि ८ हजार ५१३ मुली असे एकंदरित १९ हजार १७६ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १० हजार ५३९ मुले आणि ८ हजार ४२७ मुलींनी परीक्षा दिली. त्यातून ९ हजार ९१० मुले आणि ८१४४ मुली असे एकूण १८ हजार ५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.०३ टक्के असून मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९६.६४ इतकी आहे.
दरम्यान, अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांच्या तुलनेत वाशिमने पहिल्या क्रमांकाचा ९५.१९ टक्के निकाल दिला आहे. ३३० शाळांपैकी ९७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या ५३ ने घटली आहे. याशिवाय एकूण निकालातही गतवर्षीच्या तुलनेत २.४३ टक्क्यांची घट झाली आहे. गतवर्षी जिल्ह्याचा निकाल ९२.६२ टक्के लागला होता; तर यंदाचा निकाल ९५.१९ टक्के इतका आहे.
वाशिम तिसऱ्या; तर रिसोड पहिल्या क्रमांकावर
दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील सहा तालुक्यांच्या तुलनेत बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही रिसोड तालुक्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. गतवर्षी हा मान वाशिम तालुक्याला मिळाला होता. यंदा मात्र वाशिम तालुका तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे.
शिक्षणाचे माहेरघर सहाव्या क्रमांकावर
जिल्ह्यात शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणारा कारंजा तालुका बारावीच्या निकालाप्रमाणेच दहावीच्या निकालातही सहाव्या क्रमांकावर फेकला गेला. अन्य पाच तालुक्यांच्या तुलनेत कारंजाने ९३.२८ टक्के निकाल दिला असून या तालुक्यातील १६ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.