१०च्या नाण्यांची अशीही दैना, अधिकृत चलन बाजारात चालेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:49 AM2021-09-17T04:49:32+5:302021-09-17T04:49:32+5:30
सुनील काकडे वाशिम : रिझर्व्ह बँकेकडून चलनात आणलेली १० रुपयांची सर्वच नाणी वैध असून ते बिनदिक्कतपणे स्वीकारण्यात यावीत, असे ...
सुनील काकडे
वाशिम : रिझर्व्ह बँकेकडून चलनात आणलेली १० रुपयांची सर्वच नाणी वैध असून ते बिनदिक्कतपणे स्वीकारण्यात यावीत, असे यापूर्वी अनेकवेळा ‘आरबीआय’ने जाहीर केले. नागरिकांच्या मोबाईलवर पाठवून यासंबंधीची जनजागृतीदेखील करण्यात आली; मात्र, त्याकडे काणाडोळा करून जिल्ह्याच्या व्यापारपेठेतील बहुतांश व्यावसायिकांकडून ही नाणी स्वीकारण्यास ग्राहकांना नकार दिला जात आहे. यामुळे ज्यांच्याकडे १० रुपयांची नाणी पडून आहेत, ते नागरिक पुरते वैतागले असून ही समस्या निकाली काढण्याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष पुरविणे गरजेचे असल्याचा सूर सर्वच स्तरांतून उमटत आहे.
रिझर्व्ह बॅंकेने २००९ मध्ये १० रुपयांची नाणी चलनात आणली. सध्या १४ प्रकारची नाणी चलनात असून त्यापैकी कुठल्याच नाण्यावर अद्याप बंदी लादण्यात आलेली नाही, असे ‘आरबीआय’ने यापूर्वी अनेकवेळा स्पष्ट करून नागरिकांच्या मोबाईलवर यासंदर्भात जनजागृतीपर संदेशही पाठविले. असे असताना जिल्ह्यातील व्यापारपेठांमधील बहुतांश व्यावसायिकांकडून १० रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार दिला जात असल्याचे दिसून येत आहे.
....................
बाॅक्स :
‘आरबीआय’च्या आवाहनास प्रतिसाद नाही
१० रुपयांची १४ प्रकारची नाणी चलनात वैध असल्याचे ‘आरबीआय’ने २०१८ मध्ये जाहीर केले होते. ही सर्व नाणी वेगवेगळ्या स्वरूपातील आहेत. यामाध्यमातून आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे विविध पैलू प्रदर्शित होतात. त्यामुळे वेळोवेळी वेगवेगळ्या डिझाईनची नाणी चलनात आणली गेली आहेत, असेही रिझर्व्ह बँकेने नमूद करून सर्व बँकांनी व बाजारपेठेतील व्यावसायिकांनी १० रुपयांची नाणी स्वीकारावीत, असे आवाहन केले होते; मात्र त्यास आजतागायत विशेष प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसत आहे.
..............
बाॅक्स :
‘एसबीआय’ला जमा होतात नाणी
जिल्ह्यातील सर्वच ठिकाणच्या बाजारपेठेतील दुकानांमध्ये १० रुपयांचे नाणे स्वीकारण्यास सपशेल नकार दिला जात आहे. विशेषत: घरोघरी फिरून लोकांकडून बॅंकेत जमा केले जाणारे पैसे गोळा करणारे ‘रिकरिंग एजन्ट’ही ग्राहकांकडून १० रुपयांचे नाणे स्वीकारत नसल्याचा प्रकार घडत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियात मात्र आठवड्यातील केवळ बुधवारी ही नाणी स्वीकारली जातात. त्यादिवशी नाणी जमा करण्यासाठी ग्राहकांची चांगलीच गर्दी होते.
...................
कोट :
रिझर्व्ह बॅंकेकडून चलनात आणलेले १० रुपयांचे नाणे बंद झालेले नाही. यासंदर्भात जिल्हास्तरावर यापूर्वीही अनेकवेळा जनजागृती केली; मात्र बाजारपेठेत नाणी स्वीकारण्यास नकार का दिला जातोय, हे कळेनासे झाले आहे. १० रुपयांच्या नोटच्या तुलनेत नाण्याचे आयुष्यमान कितीतरी पटीने अधिक आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी मनात कुठलेही किंतु-परंतु न ठेवता नाणी स्वीकारायला हवी.
- डी. व्ही. निनावकर, व्यवस्थापक, अग्रणी बॅंक, वाशिम