कार्यक्रम चांगला, पण वेशीला टांगला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:17 AM2021-02-06T05:17:45+5:302021-02-06T05:17:45+5:30
काेराेनाचा प्रभाव कमी झाला असला तरी अद्याप काेराेना संपला नाही. यामुळे प्रशासनाच्यावतीनेसुद्धा मार्गदर्शक सूचनांना २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली ...
काेराेनाचा प्रभाव कमी झाला असला तरी अद्याप काेराेना संपला नाही. यामुळे प्रशासनाच्यावतीनेसुद्धा मार्गदर्शक सूचनांना २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. काेराेनाच्या पार्श्वभूमिवर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे; परंतु मंगरुळपीर व कारंजा तालुक्यामध्ये राबविण्यात येत असलेल्या या महत्त्वाच्या व चांगल्या कार्यक्रमामध्ये काेराेना नियमांचे काेणतेच पालन केल्या जात असल्याचे दिसून येत नाही. गावागावातील नागरिकांना समृद्ध गाव स्पर्धेसंदर्भात मार्गदर्शन सभा घेण्यात येत आहेत. ग्रामपंचायत, सामाजिक सभागृह किंवा गावातील नागरिकांच्या घरात यावर चर्चा केल्या जात आहे. अशावेळी दहा बाय दहा किंवा बारा बाय बाराच्या खाेलीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त ग्रामस्थ, अधिकारी, कर्मचारी बसून चर्चा करीत आहेत. यावेळी काेणत्याच प्रकारचे फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यात येत नसून, अनेक जण मास्कचाही वापर करीत नसल्याचे दिसून येत आहे.
------------------------
मार्गदर्शक सूचनांना खाे
जिल्ह्यात १ ऑक्टोंबर २०२० पासून लॉकडाऊनच्या सुधारित मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या २९ जानेवारी २०२१ च्या आदेशानुसार सदर मार्गदर्शक सूचना आता २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत लागू राहणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी १ फेब्रुवारी २०२१ रोजी निर्गमित केले आहेत; परंतु या नियमांचा या स्पर्धेत बहुतांश अधिकारी, कर्मचारीच खाे देत असल्याचे दिसून येत आहे.
----------
काेणतीच खबरदारी नाही
समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत गावकरी, शेतकऱ्यांसह बचत गटाचा सहभाग वाढावा, या उद्देशाने विविध ग्रामपंचायततर्फे शेतकरी व नारी शक्ती सन्मान व बचत गटांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी संबंधित गावातील जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, कृषी मित्र, बँक सखी, पशू सखी, शिपाई, ऑपरेटर, तालुका समन्वयक, जलमित्रांचा समावेश आहे. काेराेना संसर्ग पाहता सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे; मात्र ती घेतल्या जात नाही.