उत्तरीय तपासणीनंतरच ‘त्या’ घटनेचा होणार उलगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:08 AM2017-08-22T00:08:23+5:302017-08-22T00:08:23+5:30
मृतक ही गर्भवती असल्याचे निष्पन्न; माहेरी झाले अंतिम संस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: येथील शासकीय तंत्रनिकेतन परिसरातील एका विहिरीत शनिवार, १९ आॅगस्ट रोजी महिला व तिच्या २ वर्षाच्या चिमुकलीचा मृतदेह आढळला होता. मृत महिलेची ओळख पटली असून, ताई राजू तायडे (वय २०, रा. अमानी ता. मालेगाव जि. वाशिम), आराध्या राजू तायडे (वय २ वर्षे) असे मृतकांची नावे आहेत. विशेष म्हणजे मृतक महिलेला आठ महिण्याचा गर्भ असल्याचे समोर आले असून उत्तरीय तपासणी अहवालानंतर या घटनेचा उलगडा होणार आहे.
वाशिम ते रिसोड मार्गावर असलेल्या शासकीय तंत्र निकेतन परिसरातील एका विहिरीमध्ये महिला आणि छोट्या मुलीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती शहर पोलीसांना १९ आॅगस्ट रोजी सकाळी मिळाली होती. दोघींचेही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. मृतक महिलेचे पोट चांगलेच फुगलेले होते. ते पाण्यामुळे की सदर महिला गर्भवती असल्यामुळे, याचा उलगडा ओळख पटल्यानंतर किंवा शवविच्छेदनानंतरच शक्य होता. या घटनेची माहिती वृत्तपत्र व सोशल मिडीयाच्या माध्यमातून अमानी येथील नातेवाईकांना मिळाली. मृतक महिलेचा पती राजू तायडे हा आपल्या कुटूंबासह वाशिम शहर पोलीस स्टेशनला आला असता त्याला मृत महिलेचे व तीच्या मुलीचे फोटो दाखविले असता त्याने सदर महिला ही पत्नी असून चिमुकली ही माझी मुलगीच असल्याचे सांगितले.
मृतक ताई तायडे ही १८ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता अमानी येथून तामसी येथील आपल्या मावशीकडे जात असल्याचे आपल्या पतिला सांगितले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. मृतक ताई तायडे हिचे माहेर येवती (ता. रिसोड जि. वाशिम) असून तीचे आई-वडील तिच्या लग्नापूर्वीच स्वर्गवासी झाले. तिला दोन भाऊ असून ते दोघेही भाऊ मुंबई येथे मजुरी करून आपले कुटूंबाचे पालन पोषण करतात. अशा बिकट परिस्थितीत ताई तायडे हिने आत्महत्या केल्यामुळे तिच्या दोन्ही भावांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
मृतक महिलेच्या भावांनी आपल्या बहिणीला सासरकडील मंडळीचा त्रास असल्यामुळेच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा आरोप पोलिसांजवळ केला. अंत्यविधी आटोपल्यानंतर लेखी स्वरूपात तक्रार देण्याचा सल्ला पोलिसांनी दिला असल्याचे मृतक महिलेचा भाऊ लखन गौतम पाईकराव यांनी सांगितले. लेखी स्वरूपात तक्रार दाखल करण्यासाठी रात्री उशिरा लखन पाईकराव व त्यांचे नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसले होते. लेखी तक्रार व उत्तरीय तपासणी अहवालानंतर या घटनेचा उलगडा होईल. एक-दोन दिवसात उत्तरीय तपासणीचा अहवाल मिळेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.