प्रत्येक पिकांत आंतरपिक घेणारे गाव ‘टो’
By Admin | Published: February 8, 2017 12:55 PM2017-02-08T12:55:13+5:302017-02-08T12:55:13+5:30
प्रत्येक पिकात आंतरपिक घेवून सर्वाधिक उत्पन्न घेण्यामध्ये वाशिम तालुक्यातील ग्राम ‘टो’ गावाचा समावेश आहे.
फळबागेही आंतरपिक : शेतकऱ्यांच्या प्रयोगाला प्रशासनाचाही पुरस्कार
नंदकिशोर नारे, ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ८ - जिल्हयात अनेक गावातील वेगवेगळे वैशिष्टे आहेत. त्यापैकी एक म्हणजे वाशिम तालुक्यातील ग्राम ‘टो’ होय. जिल्हयात हळद उत्पादनासाठी शिरपूर जैन, काटा , मल्चिंग पध्दतीने शेती करण्यामध्ये मंगरुळपीर तालुका तर शेडनेटचे गाव म्हणून ओळख असलेले... तसेच प्रत्येक पिकात आंतरपिक घेवून सर्वाधिक उत्पन्न घेण्यामध्ये ‘टो’ गावाचा समावेश आहे. या गावाच्या या प्रयोगाची प्रशासनाकडूनही दखल घेत २०१५-१६ मध्ये सदर प्रयोगाव्दारे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार देवून जिल्हाधिकारी यांचेहस्त सत्कारही करण्यात आला होता.
घरचेच बियाणे, सोबत सेंद्रीय खताचा वापर करुन ‘टो’ गावचे शेतकरी थांबले नाहीत तर आंतरपिकाच्या विविध प्रयोगातून उत्पादनात वाढ करुन एक आदर्श निर्माण केला आहे. अनेक शेतकरी आंतरपिक घेतात परंतु ठरल्याप्रमाणे नेहमी त्याच त्या पिकांचा समावेश असतो, परंतु ‘टो’ येथील शेतकरी जे पीके घेतात ते ऐकल्यावर असेही होवू शकते, असे करता येते असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण होवून ते पाहणी करण्याकरीता जातात. येथीलच एका शेतकऱ्याने चक्क ५ आंतरपिके घेण्याची किमया यशस्वी करुन दाखविली आहे. त्याच पध्दतीने गावातील जवळपास प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात कोणते ना कोणते आंतरपिक घेवून उत्पादन वाढीसोबतच आपला विकास साधतांना दिसून येत आहे. ‘टो’ येथील शेतकरी सोयाबीनमध्ये तूर, गव्हात हरभरा, मोहरी घेतातचं शिवाय हळदीमध्ये सुध्दा अनेक शेतकरी उडीदाचे आंतरपिक घेत आहेत. तसेच भाजीपाला उत्पादक शेतकरी टोमॅटोमध्ये सांबार (कोथींबीर) आंतरपिक घेत आहेत. नगदी पिक म्हणून ओळख असलेल्या मिरची, टोमॅटो, आलू, गवार, जवस या पीकाचे उत्पन्न शेतकरी मोठया प्रमाणात घेत आहेत. सेंद्रीय शेतीव्दारे आंतरपिकाच्या माध्यमातून शेतामध्ये मिरचीचे उत्कृष्ट उत्पादन घेणाऱ्या प्रल्हाद कडुजी काकडे, सुदाम निवृत्ती काकडे यांचा २०१५ -१६ मध्ये जिल्हाधिकारी यांचेकडून गौरव करुन पुरस्कार देण्यात आला होता.
फळबागेतही आंतरपिक
‘टो’ येथील शेतकरी शेतात आंतरपिक तर घेतातचं शिवाय गावातील १५ शेतकऱ्यांकडे फळबाग आहे. या फळबागेतही आंतरपिक घेवून एक नविन प्रयोग करतांना दिसून येत आहेत. संत्रा, लिंबुच्या फळबागांमध्ये गहू, अॅपल बोर, पालक, सांबार, मेथी, कांदा इत्यादीआंतरपिक घेत आहेत. फळबागेतून मिळणारे उत्पादन तर मिळेलच परंतु या फळबागांना पाणी देतांना याच पाण्यावर आंतरपिकाला पाणी मिळून दुहेरी फायदा होवून उत्पन्न घेत आहेत.
शेती व्यवसाय करीत असताना कोण्या एका पिकावर अवलंबून राहणे योग्य नाही. कारण वातावरणातील बदल, निसगार्चा लहरीपणा , वारंवार कोसळणारे शेतमालाचे भाव यामुळे शेतकरी आर्थीक संकटात सापडत आहेत. कमी अधिक कालावधीमध्ये येणाऱ्या पिकांमध्ये आंतर पीक घेणे फायदयाचे ठरते असा विश्वास टो येथील शेतकऱ्यांना असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
आंतरपिक घेतल्याने उत्पादनात दिड पटाने वाढ होते. तसेच प्रतिकुल परिस्थितीमध्ये १०० टक्के निराश झाल्यापेक्षा काहींना काही शेतकऱ्यांच्या हाती पेैसा मिळून देणारे आंतरपिक पध्दत आहे.
- नामदेव काकडे , शेतकरी, ‘टो’