दरवर्षी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींचा विवाह साेहळ्याचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:43 AM2021-03-23T04:43:22+5:302021-03-23T04:43:22+5:30
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील ५ मुलींचा विवाह दरवर्षी करून समाजकार्य करण्याचा निर्णय भाऊसाहेब काळे यांनी घेऊन लग्नासाठी येणारा संपूर्ण खर्च ...
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील ५ मुलींचा विवाह दरवर्षी करून समाजकार्य करण्याचा निर्णय भाऊसाहेब काळे यांनी घेऊन लग्नासाठी येणारा संपूर्ण खर्च करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. शहरात नव्यानेच भाऊसाहेब काळे व ॲड. प्रमाेद फाटक हे मंगलकार्यालय उभारत आहेत. या अनुषंगाने काही तरी नवीन उपक्रम राबवावा या संकल्पनेतून त्यांनी चक्क मंगल कार्यालय जनसेवेत आल्यानंतर हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलींचा विवाह कसा करावा या विवंचनेत अनेक कुटुंबे दिसून येतात. वडिलांचे छत्र हिरावल्याने त्यांच्या कुटुंबियांना आधार व्हावा या संकल्पनेतून भाऊसाहेब काळे यांनी हा संकल्प केला आहे. हा उपक्रम राबविण्यापूर्वी त्यांनी मित्रमंडळीशी चर्चा केल्यानंतर या कार्याचे सर्वांनी काैतुक केले.
......................
दरवर्षी ५ मुलींची जबाबदारी
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ५ मुलींच्या लग्नसाेहळ्याचा खर्च दरवर्षी भाऊसाहेब काळे यांच्याकडून केला जाणार आहे. लग्नसाेहळा ज्या रीतिरिवाजाप्रमाणे असेल ताे केला जाणार आहे.
...................
अडीअडचणीत अनेक कुटुंब मदतीचा हात मागतात. अशाच एका घटनेतून हा निर्णय घेण्यात आला. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची परिस्थितीची जाण असल्याने फुल नाही फुलाची पाकळी मदत करावी असे वाटले व हा निर्णय घेतला. या निर्णयानंतर अनेकांनी काैतुक केले, तेव्हा खूप समाधान वाटले.
- भाऊसाहेब काळे, वाशिम