सर्वांना कोरोना लस मिळण्यासाठी दीड वर्ष प्रतीक्षा करावी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:17 AM2021-02-18T05:17:23+5:302021-02-18T05:17:23+5:30
कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव होण्याकरिता शासनाने आधी ‘फ्रंटलाइन वर्कर्स’ म्हणून जिल्ह्यात कार्यरत ६ हजार ९५० शासकीय, खासगी आरोग्य कर्मचारी ...
कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव होण्याकरिता शासनाने आधी ‘फ्रंटलाइन वर्कर्स’ म्हणून जिल्ह्यात कार्यरत ६ हजार ९५० शासकीय, खासगी आरोग्य कर्मचारी व आशा, अंगणवाडी सेविकांकरिता कोविशिल्ड लस उपलब्ध करून दिली. त्यातील ३ हजार ४८९ जणांनी लस घेतली असून १ हजार ४८० कर्मचारी लस घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. संबंधितांनी येत्या २० फेब्रुवारीपर्यंत लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महसूल आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जात आहे. त्याचे प्रमाणही कमी असून एकूण २२ हजार प्राप्त डोसपैकी १७ हजार डोस शिल्लक असल्याची माहिती मिळाली. कोरोना लसीकरणाची गती अशीच कायम राहिल्यास जिल्ह्यात सर्वांना कोरोना लस मिळण्याकरिता किमान दीड वर्ष लागणार असल्याचे दिसून येत आहे.
................
७०० जणांना जिल्ह्यात रोज लस दिली जात आहे
५००० जणांना आतापर्यंत लस दिली
..............
डोस उपलब्ध, मग गती का वाढत नाही?
जिल्ह्याला तीन टप्प्यांत शासनस्तरावरून ‘कोविशिल्ड’ आणि ‘कोवॅक्सिन’चे एकूण २२ हजार डोस प्राप्त झाले आहेत. त्यातून आशा, अंगणवाडी सेविका, शासकीय व खासगी आरोग्य कर्मचारी, महसूल आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट बाळगण्यात आले; मात्र संबंधितांपैकी अनेकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने लसीकरणाची गती मंदावली आहे.
...................
दहा दिवसांत १५० कोरोना पॉझिटिव्ह
जानेवारी महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली होती; मात्र फेब्रुवारी महिन्यात ही स्थिती बदलली असून जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत १५० नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यात विशेषत: १४ फेब्रुवारीला ४४ आणि १६ फेब्रुवारीला आढळलेल्या ३४ रुग्णांचा समावेश आहे. प्रभावी उपाययोजना न केल्यास हा आकडा असाच वाढत जाण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.
.................
कोट :
कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव होण्याकरिता कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार आशा, अंगणवाडी सेविका, शासकीय व खासगी क्षेत्रात कार्यरत आरोग्य कर्मचारी, पोलीस व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. आरोग्य विभाग यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असून संबंधितांनी लस घेण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतल्यास गती वाढणे शक्य आहे.
- डॉ. अविनाश आहेर,
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम
.......................
रोज कुठल्या केंद्रावर किती लस
वाशिम - ६५
कारंजा - ५५
रिसोड - ४५
मंगरूळपीर - ५०
मानोरा - ४०
मालेगाव - ४०
रेनॉल्ड हॉस्पिटल - ५५