अतिवृष्टीचा ९,०१४ पीकविमाधारक शेतकऱ्यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:47 AM2021-08-20T04:47:58+5:302021-08-20T04:47:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम- जिल्ह्यात गत महिन्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याचा ९,०१४ पीक विमाधारक शेतकऱ्यांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम- जिल्ह्यात गत महिन्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याचा ९,०१४ पीक विमाधारक शेतकऱ्यांना फटका बसला. या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी पीक विमा कंपनीकडे तक्रार केली असून, पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी त्यापैकी ५,३९१ शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देऊन सर्वेक्षण केले आहे.
यंदाच्या हंगामात २,२९,५९२ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे. त्यात ९५,८८३ कर्जदार, तर १,३३,७०९ बिगर कर्जदार शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांनी पीक विम्यापोटी १५.८३ कोटी रुपये भरले आहेत. शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवून अवघा महिनाभराचा काळही उलटला नसताना जुलै महिन्याच्या मध्यंतरी अतिवृष्टीने थैमान घालत पिकांचे नुकसान केले. जिल्ह्यातील ९,०१४ पीक विमाधारक शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला. त्यामुळे या शेतकऱ्यांनी पीक विमा मंजूर करण्याच्या मागणीसाठी निर्धारित ७२ तासांच्या मुदतीत पीकविमा कंपनीकडे तक्रारी केल्या. शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या शेताला भेटी देऊन नुकसानाची पाहणी करीत नोंदी घेतल्या.
-----
मंगरुळपीर, मानोऱ्यात नुकसानाचे प्रमाण अधिक
मंगरुळपीर आणि मानोरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानाचे प्रमाण अधिक आहे. मंगरुळपीर तालुक्यातील ४,७८३, तर मानोरा तालुक्यातील २,८८७ शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे नुकसान भरपाईसाठी तक्रारी केल्या आहेत.
---------
महिना उलटूनही ३,६३४ ठिकाणचे सर्वेक्षण प्रलंबितच
जिल्ह्यात यंदाही अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यासह जमिनी खरडून गेल्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात घडले आहेत. एकूण ९,०१४ शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी पीक विमा कंपनीकडे तक्रार केली असून, महिना उलटला तरी ३,६३४ ठिकाणचे सर्वेक्षण झाले नाही.
---------------
तालुकानिहाय तक्रारी आणि सर्वेक्षण
तालुका - तक्रारी - सर्वेक्षण
वाशिम - १,०७५ - १,०६४
कारंजा - ८६ - ८६
मंगरुळपीर - ४,७८३ - २,६०५
मानोरा - २,८८७ - १,४७३
रिसोड - १३३ - ११४
मालेगाव - -५० - ४९
---------------
कोट: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानापोटी विमा भरपाई मंजूर करण्यासाठी ९,०१४ शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून या पीक नुकसानाचे निकषानुसार सर्वेक्षण केले जात आहे. त्यात ५,३९१ शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी देऊन पाहणी करण्यात आली आहे.
- शंकर तोटावार,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम