आसोला खुर्द येथे बंजारा तीज उत्सव उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:30 AM2021-09-02T05:30:08+5:302021-09-02T05:30:08+5:30
बंजारा समाजात तीज उत्सवाला मोठे महत्त्व आहे. या उत्सवात गावातील वृद्ध नायक, महिला, कुमारिका डफलीच्या तालावर गायन करीत शिवारातील ...
बंजारा समाजात तीज उत्सवाला मोठे महत्त्व आहे. या उत्सवात गावातील वृद्ध नायक, महिला, कुमारिका डफलीच्या तालावर गायन करीत शिवारातील बोराच्या झाडाची पाने नायकांच्या घरी आणतात. त्यानंतर, रात्री नायकाच्या घरून गव्हाचे धान आपापल्या टोपलीत टाकून आणत, त्याचे पूजन करतात व दुसऱ्या दिवसापासून सतत २ दिवस सकाळी व सायंकाळी गावातील कुमारिका विहिरीवरून जल आणत त्यामध्ये टाकतात. यालाच ‘जवारा’ असे म्हटले जाते. त्यानंतर, गावातील घराजवळच नृत्य करीत टोपलीतील जवाऱ्यावर पाणी टाकून आनंदोत्सव साजरा करतात. यावेळी बंजारा गीते गायली जातात. तीज विसर्जनाच्या दिवशी बंजारा कुमारिका पारंपरिक पेहराव घालून तीजची टोपलीवर नृत्य करीत गीतगायन करतात. आसोला येथे पूर्ण कुटूंबातील महिला संत सोहमनाथ महाराज, आई जगदंबा, संत सेवालाल महाराजांच्या मंदिर, संस्थान स्थळी डफलीच्या तालावर पारंपरिक नृत्य सादर करून हा उत्सव साजरा करण्यात आला.
००००००००००००००००००
गावालगतच्या कुंडात तीज विसर्जन
आसोला येथे धार्मिक रूढी-परंपरेचे पालन करीत बंजारा समाजातील नायक, कारभारी प्रतिष्ठित नागरिक पुरुष महिला, कुमारिका, नवयुवकांनी संपूर्ण गावातील मुख्य मार्ग, मुख्य चौकातून डफलीच्या तालावर पारंपरिक नृत्य करीत मिरवणूक काढत गावशेजारच्या जलकुंडात तिजोत्सवाचे विसर्जन केले.