बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची होणार चौकशी; गवळींच्या तक्रारीची मुख्यमंत्र्यांकडून दखल
By सुनील काकडे | Published: February 15, 2023 06:54 PM2023-02-15T18:54:37+5:302023-02-15T18:54:59+5:30
बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची चौकशी असून खासदार भावना गवळी यांच्या तक्रारीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे.
वाशिम : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्यंकटराव मिठ्ठेवाड यांच्या विरोधातील तक्रारींबाबत खासदार भावना गवळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. त्याची दखल घेण्यात आली असून कार्यकारी अभियंत्यांची सखोल चौकशी करुन त्याबाबतचा अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्रायासह शासनास तत्काळ सादर करावा असे आदेश सचिवांच्या सुचनेवरुन महाराष्ट्र शासनाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी अमरावती प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंत्यास दिले आहेत.
कार्यकारी अभियंता व्यंकटराव मिठ्ठेवाड हे जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदारांकडून बांधकामाची देयके काढण्यासाठी कमिशन मागतात. खुल्या प्रवर्गाच्या निवेदेतील कामे कमिशन घेवून कामगार संस्थांना मॅनेज करून देतात. कंत्राटदारांप्रती त्यांचे कायम असहकाराचे धोरण असते, आदी स्वरूपातील तक्रारी जिल्हा कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष विरेंद्र देशमुख, व्ही एम. जाधव, व्ही.बी. जाधव, व्ही. एस. बळी, ए़.बी. राजे, गणेश देशमुख, नितीन जाधव, पंकज बाजड आदी कंत्राटदारांनी खासदार भावना गवळी यांच्याकडे केल्या होत्या. त्याआधारे गवळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली.
मिठ्ठेवाड यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासह त्यांना निलंबित करून विभागीय चौकशीची मागणी त्यांनी केली़ त्याची दखल घेत सचिवांच्या सुचनेवरुन शासनाचे कक्ष अधिकारी सौदागर यांनी अमरावती प्रादेशिक विभागाचे (सार्वजनिक बांधकाम) मुख्य अभियंता यांना कार्यकारी अभियंता मिठ्ठेवाड यांच्यावरील तक्रारीची चौकशी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत़