गोदामामध्ये आढळली मुदतबाहय़ कीटकनाशके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 01:49 AM2017-10-18T01:49:27+5:302017-10-18T01:50:09+5:30
मालेगाव : येथील तालुका कृषी विभागाच्या परिसरातील गोदामामध्ये मुदतबाह्य कीटकनाशके तसेच खराब झालेले फवारणी यंत्र आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. हा प्रकार शेतकरी भगवान बोरकर यांनी प्रकाशझोतात आणला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : येथील तालुका कृषी विभागाच्या परिसरातील गोदामामध्ये मुदतबाह्य कीटकनाशके तसेच खराब झालेले फवारणी यंत्र आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. हा प्रकार शेतकरी भगवान बोरकर यांनी प्रकाशझोतात आणला आहे.
भगवान बोरकर हे काही कामानिमित्त मंगळवारी तालुका कृषी विभागात गेले असता, त्यांना एका ट्रकमध्ये कुजलेले व गोदामामध्ये पडून राहून खराब झालेले फवारणी यंत्र (हॅण्ड पं प) हे भंडार विभागातील लोखंडे यांच्या देखरेखमध्ये ट्रकमध्ये भरणे सुरू असल्याचे दिसून आले. बोरकर यांनी याबद्दल विचारणा केली असता, त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. यावेळी गोदामाची पाहणी केली असता, त्यामध्ये मोठय़ा संख्येने खराब अवस्थेतील हॅण्ड पंप आढळून आले. पीक फवारणीकरिता असलेली कीटकनाशकेसुद्धा खराब झालेले व मुदतबाह्य असलेले आढळून आले. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी बोरकर यांनी केली.
काही हॅण्ड पंप हे निकृष्ट दर्जाचे असल्याने शेतकर्यांनी ते परत केले होते. संबंधित कंपनीने सदर हॅण्ड पंप परत घेऊन जावे, असे वारंवार संबंधित कंपनीला कळविले. पत्रव्यवहारही केला. याउपरही सदर साहित्य नेण्यात आले नाही. साहित्य निकृष्ट असल्याने संबंधित कंपनीला पेमेंट अदा करू नये, यासंदर्भात वरिष्ठांशी पत्रव्यवहार केलेला आहे. सदर साहित्य परत घेऊन जाण्यासाठी सोमवारी संबंधित कंपनीचा ट्रक आला होता. निकृष्ट साहित्य परत घेऊन जाताना तेथे काही शेतकरी आले. यावरून गोंधळ उडाला. गैरसमज होऊ नये म्हणून त्या गोदामाला सील लावण्यात आले. यासंदर्भातील माहिती वरिष्ठांना देण्यात आली.
- संतोष वाळके
तालुका कृषी अधिकारी मालेगाव