३६ जिल्ह्यांमधील ५ हजार चित्रांच्या प्रदर्शनास वाशिममध्ये प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 02:39 PM2020-02-26T14:39:03+5:302020-02-26T14:39:59+5:30
३६ जिल्ह्यांमधील ५ हजार चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आलेले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सामाजीक कार्यात अग्रेसर असलेल्या शांतीलाल मुथा फाऊंडेशन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक पाटणी कर्मशियल कॉम्प्लेक्स येथे मुल्यवर्धन शिक्षणावर आधारीत तीनदिवसीय राज्यस्तरीय चित्रप्रदर्शनीचे २५ फेब्रुवारी रोजी संस्थापक शांतीलाल मुथा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या उपक्रमांतर्गत ३६ जिल्ह्यांमधील ५ हजार चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आलेले आहे.
उद्घाटन कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, डायट प्राचार्य प्रमिला खरटमोल, प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, हॅप्पी फेसेस शिक्षण संस्थेचे संचालक दिलीप हेडा, जेष्ठ अधिव्याख्याता क्रांती कुलकर्णी, पवार, मुल्यवर्धन जिल्हाप्रमुख बागरेचा, सहप्रमुख निलेश सोमाणी, कार्यक्रम अधिकारी मंगेश गवई, युनिक कोचिंग क्लासेसचे प्रा. अतुल वाळले, प्रा. माधव पाटील, मुल्यवर्धन जिल्हा समन्वयक विठोबा काटेकर, राज्य समन्वयक राजेश देशलहरा, मास्टर ट्रेनर अमोल हांडगे, तालुका समन्वयक निलेश शिरभाऊ, लक्ष्मण ब्राम्हण, मोहम्मद मुजफ्फीर आदिंची उपस्थिती होती.
पुणे येथील शांतीलाल मुथा फाऊंडेशन व महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या ५०० शाळांमध्ये मुल्यवर्धन शिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवून त्यांनी आपल्या अभिनव संकल्पना चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून रेखाटल्या आहेत. संपूर्ण राज्यातील संकल्पीत केलेल्या संकल्पना या प्रदर्शनीमध्ये मांडण्यात आलेल्या आहेत. २५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत ही प्रदर्शनी सर्वांसाठी खुली असून शिक्षक, विद्यार्थी, पालक व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
(शहर प्रतिनिधी)