विविध मागण्यांसाठी आशा, गटप्रवर्तक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 03:09 PM2020-01-08T15:09:32+5:302020-01-08T15:09:43+5:30
प्रलंबित मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेनेदेखील ९ जानेवारी रोजी वाशिम येथे धरणे आंदोलन पुकारले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : विविध प्रकारच्या २५ मागण्या प्रलंबित असून, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आशा, गटप्रवर्तक संघटनेने ९ जानेवारी रोजी वाशिम येथे धरणे आंदोलन पुकारले आहे. दुसरीकडे ७ प्रकारच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेनेदेखील ९ जानेवारी रोजी वाशिम येथे धरणे आंदोलन पुकारले.
गेल्या काही दिवसांपासून अंगणवाडी सेविका, मदतनिस, मिनी अंगणवाडी सेविकांचा न्याय हक्कासाठी लढा सुरू आहे. जिल्हास्तरावर तर कधी राज्यस्तरावर आंदोलन व मोर्चे, उपोषण करूनही अंगवाडी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटता नाही. याबरोबरच आशा, गटप्रवर्तक महिलांचा तसेच शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्याही मागण्या प्रलंबित आहेत. शालेय पोषण आहाराचे निश्चित मानधन १८ हजार रुपये करण्यात यावे, सेवेत कायम करण्यात यावे, शालेय पोषण आहार योजनेंतर्गत डाटा एंट्री आॅपरेटर यांना २० हजार रुपये मानधन द्यावे, शालेय शिक्षण समितीने स्वयंपाकी, मदतनिसांची केलेली नेमणूक कायमस्वरुपी करावी, शालेय पोषण आहार योजनेंतर्गत मानधन, इंधन, भाजीपाला, बिस्किट आदींचे पैसे स्वयंपाकी, मदतनीस यांच्या बँक खात्यात जमा करावे, सेवेतून कमी करण्यात आलेल्या स्वयंपाकी, मदतनीस यांना तत्काळ कामावर घेण्यात यावे आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ८ जानेवारी रोजी देशव्यापी संपात सहभागी होणार आहेत तसेच ९ जानेवारी रोजी वाशिम येथे बेमुदत उपोषण आंदोलन केले जाणार आहे, असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय बाजड, जिल्हा उपाध्यक्ष नंदा कांबळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)