पीककर्ज भरण्यास मुदतवाढ द्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:38 AM2021-04-19T04:38:35+5:302021-04-19T04:38:35+5:30
वाशिम : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सहकारी संस्था, तसेच राष्ट्रीयीकृत बँकांकडून गेल्यावर्षी बिनव्याजी कर्ज घेतले. ते कर्ज परतफेड करण्याची मुदत ...
वाशिम : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सहकारी संस्था, तसेच राष्ट्रीयीकृत बँकांकडून गेल्यावर्षी बिनव्याजी कर्ज घेतले. ते कर्ज परतफेड करण्याची मुदत ३१ मार्च होती. या मुदतीत कर्जाचा भरणा करता आला नसल्याने ३० जूनपर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना खरीप हंगामात विविध पिकांची लागवड, बियाणे, खते यासाठी सेवा सहकारी संस्था व राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत बिनव्याजी कर्जाचे वाटप करण्यात येते. खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कपाशी पिकाची विक्री करून ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड बँकेला करावी लागते. गतवर्षी अतिवृष्टी व जोरदार झालेल्या परतीच्या पावसामुळे खरीप हंगामात उत्पादन कमी झाले. कपाशीचे बोंडसड व बोंडअळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परतीच्या पावसामुळेदेखील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे पीक कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी परतफेड करण्याची सवलत देऊन ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
------------- बॉक्स ------------
कोरोनामुळे बँकांचे कामकाज खोळंबले
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असल्याने, तसेच काही बँकेतील कर्मचारी व अधिकारी पॉझिटिव्ह आल्यामुळे बँकेतील कामकाजही प्रभावित होत आहे. ३१ मार्चच्या गडबडीत विविध बँकेत काही दिवस शेती संबंधित कामे बंदच होती, तर रोख व्यवहारांनाच प्राधान्य देण्यात आले.