शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रवेशप्रक्रियेस मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:44 AM2021-01-13T05:44:40+5:302021-01-13T05:44:40+5:30
राज्यातील शासकीय तंत्रनिकेतन व डी.फार्म अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय प्रवेशप्रक्रियेच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. आता विविध तंत्रनिकेतन आणि डी.फार्मच्या संस्थांमधील ...
राज्यातील शासकीय तंत्रनिकेतन व डी.फार्म अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय प्रवेशप्रक्रियेच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. आता विविध तंत्रनिकेतन आणि डी.फार्मच्या संस्थांमधील अनेक जागा रिक्त आहेत. या जागा केंद्रीय प्रवेशप्रक्रिया पद्धतीनेच भरल्या जाणार आहेत. या अनुषंगाने या जागांवर इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश घेता यावा म्हणून राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी या प्रवेशप्रक्रियेस १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. जे विद्यार्थी अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम तथा द्वितीय वर्षात तसेच डी.फार्मच्या प्रथम वर्षाकरिता प्रवेश घेण्यास इच्छुक आहेत; परंतु त्यांना अद्याप प्रवेश मिळाला नाही, असे विद्यार्थी या रिक्त जागांसाठी अर्ज करू शकणार आहेत. विद्यार्थ्यांना ज्या संस्थेत प्रवेश घ्यावयाचा आहे. त्या संस्थेच्या संकेतस्थळावर पडताळणी करावी किंवा संस्थेशी प्रत्यक्ष संपर्क साधून रिक्त जागांची अधिक माहिती घ्यावी, असे आवाहन अमरावी विभाग तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. आर.पी. मोगरे यांनी केले आहे.