"नवप्रकाश" योजनेला ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ
By admin | Published: June 16, 2017 07:49 PM2017-06-16T19:49:07+5:302017-06-16T19:49:07+5:30
वाशिम: कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुरू असलेल्या नवप्रकाश योजनेला येत्या ३१ आॅगस्ट २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या कृषिग्राहकांसह सर्व उच्च व लघुदाब वीज ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुरू असलेल्या नवप्रकाश योजनेला येत्या ३१ आॅगस्ट २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेत सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजना वगळता इतर ग्राहकांनी जून २०१७ ते ३१ आॅगस्ट २०१७ या कालावधीत थकबाकीची मूळ रक्कम भरल्यास ७५ टक्के व्याज व विलंब आकाराची १०० टक्के रक्कम माफ होणार आहे.
नवप्रकाश योजनेत थकबाकीची मूळ रक्कम भरणाऱ्या ग्राहकांना सुरक्षा ठेव, सर्व्हिस कनेक्शन चार्जेस, रिकनेक्शन चार्जेस यामध्ये पूर्णपणे सूट देण्यात आली असून ग्राहकांना कोणत्याही प्रतिज्ञापत्राची गरज लागणार नाही. शिवाय वीजजोडणीचा अर्ज ग्राहकांना कार्यालयात मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे. योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांसाठी महावितरणच्या ह्यडब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट महाडिस्कॉम डॉट इनह्ण या संकेतस्थळावर संबंधित ग्राहकाला थकीत देयकाची किती रक्कम भरावयाची आहे, याची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच जेथे इंटरनेटची सुविधा नसेल अशा ग्राहकांना त्यांच्या थकबाकीच्या रक्कमेचा तपशील महावितरणच्या शाखा कार्यालयापासून ते मंडल कार्यालयात तातडीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या वीजग्राहकांनी या नवप्रकाश योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.