ट्रामा केअर युनिटमधील तीन अस्थायी पदांना मिळाली मुदतवाढ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 01:21 PM2017-10-16T13:21:14+5:302017-10-16T13:22:09+5:30
वाशिम - जिल्हा सामान्य रुग्णालयातील ट्रामा केअर युनिटमधील डॉक्टरांच्या तीन अस्थायी पदांना ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत मुदतवाढ मिळाल्याने तुर्तास रूग्णांना दिलासा मिळणार आहे.
वाशिम - जिल्हा सामान्य रुग्णालयातील ट्रामा केअर युनिटमधील डॉक्टरांच्या तीन अस्थायी पदांना ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत मुदतवाढ मिळाल्याने तुर्तास रूग्णांना दिलासा मिळणार आहे.
अपघातातील गंभीर रूग्णांवर तातडीने उपचार व्हावे, अन्य प्रकारातील रूग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे २४ तास वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून जिल्हा सामान्य रूग्णालयात ट्रामा केअर युनिटची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. या युनिटमध्ये अस्थायी स्वरुपात डॉक्टरांची काही पदे भरण्यात आली तर काही पदे अद्यापही रिक्त आहेत. अस्थिव्यंग शल्य चिकित्सक (वर्ग दोन), बधिरिकरण शास्त्रज्ञ (वर्ग २) व वैद्यकीय अधिकारी (वर्ग २) अशी तीन पदे अस्थायी स्वरुपात भरण्यात आली आहेत. या पदांना ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत अंतिम मुदत मिळाली होती. डॉक्टरांची तीन पदे रिक्त राहिली तर रुग्णसेवेत व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. या पदांना मुदतवाढ मिळावी, अशी मागणी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाकडे केली होती. ही मागणी मान्य झाली असून, १३ आॅक्टोबर रोजी शासनाने या तीनही पदांना ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.