कोठारी शिवारात वन्यप्राण्यांचा उच्छाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:25 AM2021-07-03T04:25:42+5:302021-07-03T04:25:42+5:30
वाशिम : पावसाच्या लहरीपणाचा सामना शेतकरी करीत असतानाच आता वन्यप्राण्यांनीही शेतकऱ्यांना त्रस्त करून सोडले आहे. मंगरूळपीर तालुक्यातील कोठारी शिवारात ...
वाशिम : पावसाच्या लहरीपणाचा सामना शेतकरी करीत असतानाच आता वन्यप्राण्यांनीही शेतकऱ्यांना त्रस्त करून सोडले आहे. मंगरूळपीर तालुक्यातील कोठारी शिवारात निलगाय, रानडुक्कर, हरीण आदी वन्यप्राणी कोवळ्या पिकांवर ताव मारून शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे शेतकरी अधिकच संकटात सापडला आहे.
यंदा जूनच्या सुरुवातीलाच आलेल्या पावसामुळे कोठारी परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली. त्यात पावसाने खंड दिल्याने उगवलेली पिके संकटात सापडली. आता गत चार दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे या पिकांना आधार मिळाला आणि सोयाबीन, तूर, मूग, उडिदाचे पीक बहरत असतानाच निलगाय, रानडुक्कर, हरीण आदी वन्यप्राणी या पिकांवर ताव मारू न शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहेत. यंदा बियाणे आणि खतांचे दर गगनाला भिडले असताना शेतकऱ्यांनी पै-पै जोडून, उसणवार करून, कर्ज काढून पेरणी केली. बियाणे उगवले आणि पावसाच्या लहरीपणातून पीक वाचले असताना आता या पिकांचा फडशा वन्यप्राणी पाडत आहेत. त्यामुळे या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
----------
पाऊण एकरातील सोयाबीन फस्त
कोठारी शिवारात वन्यप्राण्यांनी मोठा उच्छाद मांडला आहे. त्यात सोयाबीनचे पीक वितभर वाढले असतानाच वन्यप्राणी हे पीक फस्त करीत आहेत. येथील गजानन पूर्णाजी पहुरकार यांच्या शेतातील पाऊण एकर क्षेत्रातील सोयाबीनचे पीक निलगाय, हरणांनी १ जुलै रोजी रात्री फस्त केले. वनविभागाने शिवारातील नुकसानाची पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत.