अतिक्रमित वनजमिनीवरील पीक केले नष्ट
By admin | Published: October 7, 2015 02:19 AM2015-10-07T02:19:57+5:302015-10-07T02:19:57+5:30
वनविभागाची कारवाई; पिकांमध्ये चारली गुरे.
राजुरा (जि. वाशिम): मेडशी वनपरिक्षेत अधिकारी कार्यालय अंतर्गत येत असलेल्या राजुरा येथील अतिक्रमित वनजमिनीवरील पिकांमध्ये गुरे चारून नष्ट करण्याची कारवाई वनअधिकार्यांनी ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १0 वाजताच्या सुमारास केली. यामध्ये अतिक्रमकांनी पेरलेल्या तुरीच्या पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. मेडशी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय अंतर्गत येत असलेल्या मुंगळा, पांगराबंदी, अमाना, किन्हीराजा आदी वतरुळातील जवळपास ५५ ते ६0 हेक्टर वनजमिनीवर गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून अनेक कुटुंब आपला उदरनिर्वाह करीत आहेत. वनविभागाकडून कार्यवाहीत सातत्य नसल्याने हे कुटुंब वनजमिनीवर पेरणी करून पिके घेतात. यावर्षी पेरणीदरम्यानच वनविभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी जागता पहारा देत अतिक्रमित वनजमिनीवर पेरणी करण्यास अनेकांना मज्जाव केला, तर काही जणांविरुद्ध पोलिसासह कारवाई केल्याने वनजमिनीवर तुरळक ठिकाणी पेरणी झाल्याचे चित्र होते. कुठल्याही परिस्थितीत अतिक्रमित वनजमिनीवरील पिके नष्ट करण्याचे निर्देश वरिष्ठ स्तरावरून मिळताच मेडशी वनपरिक्षेत्र अधिकार्यांनी अतिक्रमण हटविण्याबाबतची धडक मोहीम हाती होत, त्याचा प्रारंभ राजुरा गावापासून करण्यात आला. मंगळवारी सकाळी १0 वाजताच्या सुमारास वनविभागाचे जवळपास ३0 ते ४0 कर्मचार्यांसह अधिकारीवर्ग वनविभागाच्या शेतशिवारात संपूर्ण तयारीनिशी दाखल झाला. त्यांनी गावातील गाय गवार्यासह इतरही पशुपालकांसह जनावरांना बोलावून घेत राजुरा येथील देवमन झ्याटे यांच्या ताब्यातील दोन हेक्टर अतिक्रमित वनजमिनीवरील तुरीच्या पिकाची नासधूस करून गुरांच्या चटाईसाठी मोकळी करुन दिली. यात अतिक्रमकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.