सरकारी रुग्णालयातील नेत्रशस्त्रक्रिया थांबल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 11:42 AM2020-06-21T11:42:07+5:302020-06-21T11:42:42+5:30
लॉकडाऊनच्या काळात आरोग्य विभागाने अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता इतर शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर आरोग्य यंत्रणा कोरोनाबाधित रुग्ण आणि संदिग्ध रुग्णांच्या उपचारार्थ तैनात असल्याने, कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांवरील उपचार आणि शस्त्रक्रिया प्रभावित होत असल्याचे दिसून येते. गत अडीच महिन्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात एकाही नेत्र रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली नाही. नेत्र शस्त्रक्रियाचे रुग्ण शक्यतोवर वयस्क, मधूमेह, उच्च रक्तदाब आदी गटातील असल्याने तुर्तास शस्त्रक्रिया झाल्या नसल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र शासनाने २२ मार्चपासून लॉकडाऊन लागू केले. या लॉकडाऊनच्या काळात आरोग्य विभागानेसुद्धा अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता इतर शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या. त्याचा फटका नेत्र रुग्णांनाही बसल्याचे दिसून येते. नेत्र शस्त्रक्रिया थांबल्याने गोरगरीब रुग्णांची गैरसोय होत आहे. दुसरीकडे नेत्र शस्त्रक्रियेचे रुग्ण शक्यतोवर वयस्क, अतिजोखमीच्या गटातील असल्याने आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात कोरोनाबाधित तसेच संदिग्ध रुग्णांवर उपचार सुरू असल्याने, कोणताही धोका नको म्हणून नेत्रशस्त्रक्रिया या दरम्यान झाल्या नसल्याचा दावा आरोग्य विभागाने केला.
अत्यावश्यक आरोग्य सेवेला प्राधान्य
कोरोनाच्या पृष्ठभूमीवर अत्यावश्यक आरोग्य सेवेला प्राधान्य दिले जात आहे. अत्यावश्यक असलेल्या शस्त्रक्रिया थांबविण्यात येत नाहीत, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध प्रकारच्या नेत्रशस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध आहे. कोरोनापूर्वी नियमित नेत्रशस्त्रक्रिया केल्याही जात होत्या. कोरोना विषाणू संसर्गाच्या कालावधीत नेत्र शस्त्रक्रियेसाठी रुग्णही शक्यतोवर येत नाहीत. संभाव्य कोणताही धोका म्हणून लॉकडाऊनच्या काळात नेत्र शस्त्रक्रिया झाल्या नाहीत. अत्यावश्यक शस्त्रक्रिया सुरू आहेत.
- डॉ. अंबादास सोनटक्के
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम