पहिल्याच दिवशी १९ रुग्णांच्या नेत्रशस्त्रक्रिया, जिल्ह्यात विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहिमेस प्रारंभ
By दिनेश पठाडे | Published: February 19, 2024 04:11 PM2024-02-19T16:11:51+5:302024-02-19T16:12:08+5:30
राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शासनामार्फत विशेष मोहीम ‘राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान’ जून २०२२ पासून राबविण्यात येत आहे.
वाशिम : जिल्ह्यात १९ फेब्रुवारीपासून विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी दुपारी १२:३० वाजेपर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयात १९ रुग्णांच्या नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आल्या.
राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शासनामार्फत विशेष मोहीम ‘राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान’ जून २०२२ पासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेत ५० किंवा अधिक वयाच्या लोकांमध्ये अंधत्व आणि एसआयव्ही कारणीभूत असलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया अनुशेष पूर्ण करण्याचे लक्ष्य समोर ठेवण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने वाशिम जिल्ह्यात १९ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२४ या कालावधीत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर राबविले जाणार आहे.
त्यानिमित्ताने सोमवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी करून रुग्णांची नेत्रशस्त्रक्रिया करून मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बालाजी हरण, नेत्रशल्य चिकित्सक डॉ. आशिष बेदरकर, डॉ. अविनाश पुरी, डॉ. स्मितल मेटांगे, डॉ. अश्विन पराती, डॉ. पूजा चव्हाण, अधिपरिचारिका चव्हाण, नेत्रचिकित्सा अधिकारी ज्ञानेश्वर पोटफाडे, सुधीर साळवे, गणेश व्यवहारे, रवी घुगे, रमेश ठाकरे, ओम राऊत यांची उपस्थिती होती.
प्रत्येक आरोग्य केंद्र स्तरावर होणार तपासणी
या मोहिमेदरम्यान ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र स्तरावर केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व नेत्रचिकित्सा अधिकारी यांच्यामार्फत रुग्णांची तपासणी करण्यात येईल. आशा स्वयं सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक व समुदाय अधिकारी यांच्याकडून नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. निदान झालेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयात करण्यात येणार आहेत.
मोतीबिंदूची लक्षणे कोणती?
डोळ्यातील नेत्रमणी(लेन्स) धूसर किंवा पांढरा होणे
कोणत्याही प्रकारची वेदना न होता दृष्टी कमी होत जाणे
चष्म्याचा नंबर बदलणे, मोतीबिंदूचा वयोमानानुसार दोन्ही डोळ्यांवर प्रभाव पडतो