दांडियाच्या नावावर फोफावतेय डान्स संस्कृती!
By Admin | Published: October 14, 2015 01:59 AM2015-10-14T01:59:26+5:302015-10-14T01:59:26+5:30
लोकमत परिचर्चेत मान्यवरांचा सूर; गरबा व दांडियांची होतेय स्पर्धा.
वाशिम : कधी काळी भक्तीमय वातावरणात व श्रद्धापूर्वक साजरा होत असलेल्या दुर्गा उत्सवात कालांतराने आधुनिकता आली. भक्तीमय वातावरणात गरबा नृत्य खेळल्या जात असे मात्र आधुनिकतेच्या या युगात युवक-युवतींमध्ये गरबा व दांडीया खेळण्याची स्पर्धा सुरु झाली. गरबा व दांडियाच्या नावावर चक्क डान्स संस्कृती फोफावत असल्याची चिंता व्यक्त करीत असल्याचा सूर लोकमतच्या परिचर्चेत मान्यवरांनी काढला. स्थानिक लोकमत जिल्हा कार्यालयात १३ ऑक्टोबर रोजी दुर्गोत्सवाचे बदलते स्वरुप या विषयावर परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. या परिचर्चेत शहरातील अनिल धुमकेकर, श्रीनिवास व्यास, दिनेश काशिकर, रविंद्र पेंढारकर, गजानन चव्हाण व सुरेश जावळे या मान्यवरांनी सहभाग घेतला होता. घटस्थापनेपासून विजयादशमी दरम्यान नउ दिवस संपूर्ण भारतात नवरात्री उत्सव उत्साहात, धार्मिक भक्तीमय वातावरणात दुर्गोत्सवाचे आयोजन करुन भक्ती व संस्कृतीचे जतन करण्याची परंपरा आहे. नवदुर्गा, नवरागिनी, नवशक्ती अशा नउ रुपात नारी शक्तीचे महत्व यातून प्रकट होतो. पश्चिम बंगाल, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांसह भारतातील सर्वच राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मोठय़ा प्रमाणात नवरात्री दुर्गोत्सव साजरा होत असतो. आदीशक्ती माता दुर्गा म्हणजेच स्त्रीशक्ती की जी या विश्वाची निर्मिती आहे. म्हणून तिला पुजण्याची ही भारतीय वैदीक परंपरा असल्याचे मत व्यक्त करीत अलिकडच्या काळात आधुनिकतेच्या मागे लागून दुर्गोत्सव भक्तीमय वातावरण हटविण्याची खंत परिचर्चेत सहभागी मान्यवरांनी व्यक्त केली. गरबा नृत्यातील सोज्वळपणा व धाद्गमकता लोप पावली असून गरबा व दांडियाच्या नावावर मात्र डान्स संस्कृती फोफावत असून दुर्गोत्सवातील भक्ती व संस्कृतीचा र्हास होत असल्याचा सूर परिचर्चेत सहभागी मान्यवरांनी आवळला.