लोकसहभागातून २.४९ कोटी लीटर पाणी साठवण्याची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 02:32 PM2019-03-08T14:32:24+5:302019-03-08T14:32:34+5:30
जलसंधारणाची विविध कामे केल्यानंतर आता साखरावासियांनी गावातील तलावाचे लोकसहभागातून खोलीकरण केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गावाच्या पाचवीला पुजलेली पाणीटंचाईची समस्या हद्दपार करण्याचा जणू वाशिम जिल्ह्यातील साखरावासियांनी विडाच उचलला आहे. जलसंधारणाची विविध कामे केल्यानंतर आता साखरावासियांनी गावातील तलावाचे लोकसहभागातून खोलीकरण केले आहे. यामुळे तब्बल २.४९ कोटी लिटर पाण्याची साठवणूक होणार आहे. शेतकरी, ग्रामस्थांनी लोकवर्गणी आणि श्रमदानातून ही किमया साधली आहे.
आदर्श गाव साखरा येथील जलमित्र तथा ग्रामकार्यकर्ते सुखदेव आत्माराम इंगळे यांनी जलमित्र या नात्याने गावात जलजागृती व जनजागृती केली. त्यांच्या या कार्याचे फलित झाले आणि गावातील बुजत चाललेल्या तलावाचे पुनरुज्जीवन झाले. १० जेसीबी मशीनच्या आधारे या तलावातील गाळाचा उपसा करण्यात आला आणि हा गाळ शेतकºयांनी आपल्या शेतात टाकून आपली हलकी जमीन सुपिक बनवली आहे. शेतकरी, ग्रामस्थांच्या श्रमदानासह लोकवर्गणीतून या तलावाचे खोलीकरण करण्यात आल्यानंतर तलावाची लांबी २६० मीटर, रुंदी १२० मीटर आणि खोली ८० मीटर झाली आहे. त्यामुळे या तलावाची पाणी साठवण क्षमता २ कोटी ४९ लाख ६० हजार लीटर झाली आहे. यामुळे गावातील भुजल पातळीतही वाढ होणार असुन, त्याचा फायदा शेती सिंचनासह गुरा ढोरांना होईल आणि भविष्यात पिण्याच्या पाण्याची अडचण भासणार नाही.
८८२० ब्रास गाळ उपसा
साखरा येथे लोक सहभागातून करण्यात आलेले तलाव खोलीकरण जिल्हाभरातील लोकांसाठी आदर्श ठरावे, असेच आहे. या तलावासाठी अवघ्या ७ जेसीबी मशीनच्या आधारे १० दिवसांत तब्बल ८८२० ब्रास खोदकाम करून गाळाचा उपसा करण्यात आला. तर १९ शेतकºयांनी तब्बल ८६९० ट्रॉली गाळ नेऊन आपल्या शेतात टाकला आहे. त्यात गजानन राऊत आणि महादेव राऊत यांनी प्रत्येकी २००० ट्रॉली, भास्कर महाले यांनी ७०२ ट्रॉली, गजानन इंगळे यांनी ५५० ट्रॉली, राजाराम वैद्य यांनी ५०२, विजय अघम यांनी ३९०, मधुकर शिंदें यांनी ३६०, रामराव इंगळे, लक्ष्मण राऊत, भास्कर ठाकरे, सखाराम राऊत यांनी प्रत्येकी ३५०, मारोती इंगळे, रामचंद्र इंगळे यांनी प्रत्येकी १६०, महादेव महाले १५५, पंढरी महाले १५०, तर बंडू धतुडे, शिवाजी शिंदे, श्रीराम महाले यांनी प्रत्येकी १०० ट्रॉली गाळ शेतात नेऊन टाकला आहे.