मालेगावात कोविड केअर सेंटरची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:43 AM2021-05-07T04:43:02+5:302021-05-07T04:43:02+5:30
मालेगाव शहरासह ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे. या रुग्णांना भरती करून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तालुक्यात शासकीय व्यवस्था नसल्याने ...
मालेगाव शहरासह ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे. या रुग्णांना भरती करून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तालुक्यात शासकीय व्यवस्था नसल्याने रुग्णांना वाशिम येथे न्यावे लागत होते. कमी लक्षणे असणाऱ्यांनासुद्धा वाशिम येथे खाजगी किंवा शासकीय कोविड सेंटरमध्ये भरती केले जात आहे. त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणेवर ताण येत होता. म्हणून मालेगाव येथे किमान १०० बेडचे कोविड सेंटर ऑक्सिजन, व्हेंटिलेटर सुविधेसह सुरू करण्यात यावे, असा सूर उमटत होता. यासाठी ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याला नागरिकांमधूनही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे येथील ना.ना. मुंदडा विद्यालयामध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. येथे सध्या ३० बेडची व्यवस्था करण्यात आली असून, तेथे पॉझिटिव्ह रुग्णांना ठेवण्यात येणार आहे आणि त्यांच्यावर प्राथमिक स्वरूपाचे औषधोपचार करण्यात येणार आहेत. हे सर्व रुग्ण तज्ज्ञ आरोग्य चमूच्या देखरेखीखाली राहणार आहेत. एखाद्या रुग्णाला आवश्यकता भासल्यास वाशिम येथे नेण्यासाठी शासनाने रुग्णवाहिकेची व्यवस्थादेखील केली आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना रुग्णांची सोय झाली आहे. त्यांच्या जेवणाची सोय मुंदडा विद्यालयाचे अध्यक्ष श्यामसुंदर मुंदडा व शिवभोजन केंद्रामार्फत केली जाणार आहे. असे असले तरी सहा दिवसांत या कोविड केअर सेंटरमध्ये केवळ तीन ते चार रुग्ण दाखल झाले. तज्ज्ञ डाॅक्टरांचा अभाव यामुळेही रुग्ण कदाचित कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होत नसावे, असाही अंदाज वर्तविला जात आहे. याउलट मात्र खाजगी रुग्णालयामध्ये बहुतेक रुग्ण भरती होत असून तिकडे खूप गर्दी आहे. त्यांचे प्रचंड देयकही अदा केले जाते. तरीही, गोरगरीब जनतेसाठी मालेगाव येथील केअर सेंटर नक्कीच वरदान ठरले असून, त्यामध्ये कमी लक्षणे असलेल्या रुग्णांनी भरती व्हावे, असे आवाहन केले जात आहे. वरिष्ठांमार्फत दररोज येथे सेवा सुरू आहेत. रुग्णाला प्राथमिक उपचार येथे दिले जातात. येथे व्यवस्था छान आहे. रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे डॉ. गुट्टे यांनी सांगितले.
..
मालेगाव शहरातील नाना मुंदडा विद्यालय येथे कोविड केअर सेंटर उभे केले असून तिथे डॉक्टर, कर्मचारी आहेत. प्राथमिक उपचार करून सेंटरमध्ये राहण्याचीसुद्धा सोय आहे. आवश्यकता वाटल्यास रुग्णाला वाशिमलासुद्धा नेता येईल. कोरोना संक्रमित रुग्णांनी इतरत्र न फिरता या सेंटरमध्ये यावे.
डॉ. संतोष बोरसे,
तालुका आरोग्य अधिकारी मालेगाव
...