जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन शस्त्रक्रियागृहांची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:47 AM2021-08-20T04:47:19+5:302021-08-20T04:47:19+5:30
वाशिम : जिल्हा वार्षिक योजनेतून उपलब्ध करून दिलेल्या निधीतून जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन अद्ययावत शस्त्रक्रियागृहे (मोड्युलर ऑपरेशन थिएटर) उभारण्यात ...
वाशिम : जिल्हा वार्षिक योजनेतून उपलब्ध करून दिलेल्या निधीतून जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन अद्ययावत शस्त्रक्रियागृहे (मोड्युलर ऑपरेशन थिएटर) उभारण्यात आली आहेत. या शस्त्रक्रियागृहांचे उद्घाटन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते १५ ऑगस्ट रोजी करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, खासदार भावना गवळी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धम्मपाल खेळकर, डॉ. सी. के. यादव, डॉ. अनिल कावरखे, डॉ. बाळासाहेब थोरात, डॉ. मोरे, डॉ. संदीप हेडाऊ, डॉ. लक्ष्मीकांत राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री देसाई यांनी दोन्ही शस्त्रक्रियागृहांची पाहणी केली. तसेच तेथील तंत्रज्ञानाच्या वापराविषयी माहिती जाणून घेतली. अद्ययावत शस्त्रक्रियागृहासाठी वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेवेळी होणाऱ्या संसर्गाचा धोका कमी होणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राठोड यांनी यावेळी सांगितले.
००००००
चांगल्या सुविधा पुरविण्याच्या सूचना
पालकमंत्री देसाई यांनी यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांची विचारपूस केली तसेच त्यांना पुरविण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधांबाबत त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या सर्व रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा पुरविण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य विभागाला केल्या.