गृह विलगीकरणाचे नियम न पाळल्यास होणार संस्थात्मक विलगीकरणात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:42 AM2021-04-01T04:42:21+5:302021-04-01T04:42:21+5:30
लक्षणे असणाऱ्या कोविड बाधितांना व गृह विलगीकरण नियमांचे पालन न करणाऱ्या रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. रुग्णांची ...
लक्षणे असणाऱ्या कोविड बाधितांना व गृह विलगीकरण नियमांचे पालन न करणाऱ्या रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. रुग्णांची परिस्थिती पाहून आरोग्य विभागाने रुग्णाला संस्थात्मक विलगीकरण म्हणजे कोविड केअर सेंटर अथवा कोविड केअर हॉस्पिटल किंवा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल यापैकी एका संस्थेमध्ये ठेवण्यात येणार आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याकरिता लक्षणे असलेल्या व्यक्ती, तसेच कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती व जास्त जोखीम असलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी केली जात आहे. या तपासणीला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. नागरिकांनी कोरोना तपासणीस नकार दिल्यास अशा नागरिकांवर साथरोग अधिनियम १८९७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा. पोलिसांनी तपासणी पथकाला आवश्यक ते सर्व सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.