वाशिममध्ये बनावट दागिन्यांद्वारे फसविणारी टोळी पोलिसांच्या तावडीत
By सुनील काकडे | Published: August 25, 2023 05:01 PM2023-08-25T17:01:20+5:302023-08-25T17:02:20+5:30
जिल्ह्यातील मंगरूळपिरच्या डी.बी. पथकाने २४ ऑगस्ट रोजी ही कारवाई केली.
वाशिम : पिवळ्या रंगाच्या धातूपासून तयार केलेले दागिने सोन्याचे दागिणे म्हणून लाखो रुपयांना विक्री करण्याच्या बेतात असलेली टोळी पोलिसांच्या तावडीत अडकली आहे. जिल्ह्यातील मंगरूळपिरच्या डी.बी. पथकाने २४ ऑगस्ट रोजी ही कारवाई केली. याप्रकरणी जेरबंद आरोपींकडून ४९ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ ऑगस्ट रोजी दोन इसमांनी डॉ. राम अरुणराव भोजने यांच्या क्लिनीकमध्ये येवून आम्हाला पैशांची अत्यंत आवश्यकता असून आमच्याकडे असलेले एक ते दिड किलो सोन्याचे दागिने तुम्हाला कमी पैशात विकत देतो, अशी बतावणी त्यांनी केली. भोजने यांनी संबंधितांना दागिने घेवून मंगरूळपीर येथे येण्यास सांगितले असता, या व्यवहाराबाबत कुणाशीही वाच्यता करू नका, असे ते इसम म्हणाले. त्यामुळे संशय आल्याने डाॅ. भोजने यांनी पोलिसांना यासंदर्भात अवगत केले.
दरम्यान, २४ ऑगस्ट रोजी त्याच इसमांचा डाॅ. राम भोजने यांना फोन आला. त्यांनी पैसे घेवून शेलूबाजार येथे येण्यास सांगितले. माहिती मिळताच डी.बी. पथकाने फसवणूक करण्याच्या बेतात असलेल्या इसमांना पकडण्यासाठी सापळा रचला. सहायक पोलिस निरीक्षक निलेश शेंबडे, पोलिस उप निरीक्षक दिनकर राठोड, अमोल मुंदे, मो. परसुवाले, जितेंद्र ठाकरे यांनी शेलुबाजारातील एका घरात धाड टाकून दीपक हरिलाल परमार (१८, मानेवाडा, मंगलदीप नगर, नागपूर), दिनेश नंदू सोलंकी (२१), शंकर रमेश पवार (४५), राजू केशराम पवार (३९, तिघेही रा. तिरोडा, जि. गोंदिया), नत्थू मोहनलाल बघेल (४२, रा. कोलीखाय चौक, उमरेड नागपूर, लक्ष्मण हरी सोळंकी (४३, रा. महाकाली नगर, नागपूर) यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून ७७२० कि.ग्रॅ. वजनाचे पिवळया रंगाच्या धातूचे दागीने (किंमत १५ हजार १४० रूपये), मोबाईल (३२४००) आणि रोख रक्कम २२८० असा एकूण ४९ हजार ८२० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. डाॅ. राम भोजने यांच्या फिर्यादीवरून आरोपींवर भादंविचे कलम ४२०, ४१९, ४१७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पुढील तपास सपोनि मल्लीकार्जून वाघमोडे करीत आहे.