भर जहागीर येथील प्राचीन शिवकुंडाची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 05:26 PM2020-12-22T17:26:01+5:302020-12-22T17:26:55+5:30
भर जहॉगीर गावाची पौराणिक ओळख लोप पावत असल्याने ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी सर्वांगीन पुढाकाराची गरज आहे.
ऐतिहासिक वास्तूंचे जतन व्हावे
भर जहॉगीर : स्थानिक हेमाडपंथी मंदिर परिसरातील प्राचीन शिवकुंडाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. परिणामी, भर जहॉगीर गावाची पौराणिक ओळख लोप पावत असल्याने ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी सर्वांगीन पुढाकाराची गरज आहे.
भर जहॉगीर गावाला पौराणिक महत्व लाभल्याचे विविध धार्मिक ग्रथांमधून विषद होते. भर जहॉगीर या गावाचे पौराणिक नाव 'भार' होते. याचा दाखला भावार्थ रामायणामध्ये आहे. येथे शेकडो वर्षांपूर्वी भारद्वाज ॠषी वास्तव्यास राहत होते तसेच महानिर्वाणी आखाड्यातील महंतांनी गावाचे संरक्षण केल्याची आख्यायिका आहे. येथील पंचक्रोशीवर महानिर्वाणी आखाड्याची आजही जहागिरी असल्याने या गावाला भर जहॉगीर असे नाव बहाल झालेले आहे. येथील हेमाडपंथी शिवमंदिरामध्ये प्रवेश करण्याआधी प्रत्येक शिवभक्त शिवकुंडामध्ये स्नान करून दर्शन घेत होते. या शिवकुंडाची रचना अतिशय सुरेख असल्याने जलतरणाचा अनुभव नसलेले भक्तगणसुध्दा सहज या शिवकुंडामध्ये स्नान करीत होते. परंतु मागील काही वर्षांपासून या वास्तुकडे दुर्लक्ष झाले आणि सद्यस्थितीत तर शिवकुंडाची चारही बाजूने मोठ्या प्रमाणात पडझड झाली. प्राचीन वास्तू जपण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असा सूर गावकºयांमधून उमटत आहे.