शेतमालाच्या किमतीत घसरण; शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ येतील केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:47 AM2021-09-23T04:47:23+5:302021-09-23T04:47:23+5:30
वाशिम : सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून केंद्रात सत्तारूढ झालेल्या मोदी सरकारच्या काळात प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी ‘अच्छे ...
वाशिम : सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून केंद्रात सत्तारूढ झालेल्या मोदी सरकारच्या काळात प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी ‘अच्छे दिन’ हे स्वप्नच ठरत आहे. शेतमाल घरात येताच बाजारभाव कोसळत असल्याने शेतमालाच्या भावात वाढ करावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबूराव शिंदे यांनी २१ सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनामार्फत पंतप्रधानांकडे केली.
निवेदनात नमूद केले की, गेल्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या घरामध्ये सोयाबीन नसताना सोयाबीनचे भाव गगनाला भिडले होते. अर्थातच त्या वाढलेल्या भावाचा फायदा केवळ व्यापारी व प्रक्रिया उद्योगाला झाला. तरीही येणाऱ्या हंगामात सोयाबीनला चांगले भाव मिळतील या आशेवर शेतकरी होते. अशातच काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान वगळता इतरत्र सोयाबीनचे पीक हे चांगल्या प्रकारे आल्याचे दिसून येत आहे; परंतु शेतकऱ्याच्या घरात सोयाबीन येण्याची चाहूल लागताच गगनाला भिडलेले भाव जमिनीवर येऊन आदळले. नेमका हा फटका कशाचा? भारतात आयात केलेल्या सोयापेंड, सोया पदार्थांचा, की शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक रसातळाला नेऊन घालण्याचा हा यशस्वी प्रयत्न तर नाही ना? असा प्रश्नही बाबूराव शिंदे यांनी निवेदनाद्वारे उपस्थित केला. गेल्या काही वर्षांपासून शेतकरी व शेतकरी कुटुंबांतील तरुणांना सोन्याचे दिवस येण्याचे स्वप्न दाखविले जात आहे. मात्र, सध्या शेतकऱ्यांच्या बाबतीत तरी त्याच्या उलट घडत आहे. कृषिप्रधान देशातील शेती व्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला इतर भाववाढीच्या प्रमाणात योग्य भाव मिळणे आवश्यक आहे. योग्य भाव मिळाला तरच शेतकऱ्यांच्याही घरात आनंदाची दिवाळी साजरी होईल. शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी जगाच्या स्पर्धेत टिकतील. म्हणून शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून सर्वच शेतमालाचे भाव शेतकऱ्यांना परवडतील अशाच दराने द्यावेत, अशी मागणी बाबूराव शिंदे यांनी निवेदनाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.
.....
महागाईचा शेतकऱ्यांना फटका
जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडत आहेत. एकीकडे इतर वस्तू, साहित्याचे भाव हे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना परवडणार नाहीत, अशा पद्धतीने वाढत आहेत, तर दुसरीकडे शेतीमालाचे भाव आहेत तिथेच आहेत. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर तसेच शेती व शेतकऱ्यांवर अवलंबून असलेले सर्वच घटक हतबल झाल्याचे दिसून येते, असे शिंदे यांनी निवेदनात नमूद केले.