वाशिम जिल्ह्यात कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 11:28 AM2020-08-07T11:28:37+5:302020-08-07T11:28:44+5:30
एप्रिल ते जुलै या चार महिन्यात एकही कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया झाली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : साधारणत: मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव असून, एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातील कुटुंबकल्याण तसेच नेत्रशस्त्रक्रिया प्रभावित झाल्या आहेत. एप्रिल ते जुलै या चार महिन्यात एकही कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया झाली नाही.
कोरोनाच्या पृष्ठभूमीवर सरकारी आरोग्य यंत्रणा कोरोनाबाधित आणि संदिग्ध रुग्णांच्या उपचारार्थ तैनात असल्याने, कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांवरील उपचार आणि शस्त्रक्रिया प्रभावित होत असल्याचे दिसून येते. मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव असून, हा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र शासनाने २२ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ लागू केले. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. जून, जुलै महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली. सरकारी आरोग्य यंत्रणा ही कोरोनाबाधित तसेच संदिग्ध रुग्णांच्या उपचारार्थ तैनात असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयांमधील कुटुंबकल्याण, नेत्रशस्त्रक्रिया व अन्य शस्त्रक्रिया प्रभावित होत असल्याचे समोर येत आहे. ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात एप्रिल ते ४ आॅगस्ट २०२० या दरम्यान एकही कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया झाली नाही. नेत्रशस्त्रक्रियाही प्रभावित झाल्या आहेत. परिणामी, गोरगरीब रुग्णांना खासगी दवाखान्यात नेत्रशस्त्रक्रिया तसेच कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करण्याची वेळ येऊन ठेपल्याने आर्थिक भूर्दंड बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला असल्याने याचा परिणाम अन्य शस्त्रक्रियांवर होत आहे.
लवकरच शस्त्रक्रिया विभाग सुरू करू !
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयासह कोविड केअर सेंटर येथे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याकामी आरोग्य यंत्रणा गुंतली आहे.
४कोरोनाच्या कालावधीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया प्रभावित झाल्या. कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया तसेच नेत्रशस्त्रक्रिया लवकरच सुरू केल्या जातील, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी सांगितले.