कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी महिलांनाच केले जाते पुढे; पुरुषांचे मात्र हात वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 12:11 PM2021-02-07T12:11:56+5:302021-02-07T12:16:11+5:30

Family planning surgery News जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत केवळ सात पुरुषांनी नसबंदी केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Family planning surgery is performed only on women; Men not intrested | कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी महिलांनाच केले जाते पुढे; पुरुषांचे मात्र हात वर

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी महिलांनाच केले जाते पुढे; पुरुषांचे मात्र हात वर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: कुटुंब नियोजनासाठी महिलांप्रमाणेच पुरुषांनीही स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन शस्त्रक्रिया करून घ्यावी, याबाबत शासनस्तरावरून सातत्याने जनजागृती केली जात आहे. प्रत्यक्षात मात्र आजही कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी महिलांनाच पुढे केले जात असल्याचे चित्र आहे.  जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत केवळ सात पुरुषांनी नसबंदी केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या लोकसंख्येवर आळा घालण्याकरिता शासनाकडून विविध स्वरूपातील योजना आखल्या जात आहेत. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी गेल्या काही वर्षांत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापरदेखील व्हायला लागला आहे. असे असले, तरी पुरुषांच्या मानसिकतेत कुठलाही बदल झाला नसल्याचे वास्तव आकडेवारीवरून समोर येत आहे. वाशिम जिल्ह्यात सन २०१९ मध्ये ३१८५ महिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली. यावर्षी पुरुषांचा आकडा केवळ तीन आहे; तर २०२० मध्ये २२५२ महिलांच्या तुलनेत चार पुरुषांनी नसबंदी करून घेतल्याची माहिती मिळाली. 
दरम्यान, आरोग्य विभागाकडून पुरुषांच्या नसबंदीचे प्रमाण वाढण्यासंबंधी पोस्टरबाजीव्यतिरीक्त ठोस अशी जनजागृती केली जात नसल्यानेच पुरुषांच्या कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे.  

काय आहेत गैरसमज?

पुरुष नसबंदी ही तुलनेने सोपी व सुरक्षित अशी शस्त्रक्रिया आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातही शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे; मात्र यासंबंधी पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. त्यात प्रामुख्याने शस्त्रक्रिया केल्यानंतर नपुंसकता येते, ओझे उचलता येत नाही, यासारख्या गैरसमजांचा समावेश आहे.


ग्रामीणप्रमाणेच शहरी भागातही पुरुष नसबंदीबाबत अनेक गैरसमज आहेत. आरोग्य विभागाकडून पुरुषांनीही शस्त्रक्रिया करून घेण्याबाबत आवाहन केले जाते; मात्र प्रभावी जनजागृती केली जात नसल्याने प्रमाण कमी आहे.
- मनिष डांगे


लोकसंख्या नियंत्रणासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महिलांप्रमाणेच पुरुषांनीही यासाठी पुढे यावे, याबाबत वेळोवेळी आवाहन केले जाते. त्याअनुषंगाने जाहिरातबाजीही करण्यात येते; मात्र त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. पुरुषांनी गैरसमज न बाळगता पुढे यायला हवे.
- डॉ. अविनाश आहेर,  जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

 

Web Title: Family planning surgery is performed only on women; Men not intrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.