लोकवर्गणीतून शेत रस्त्याचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:51 AM2021-06-09T04:51:01+5:302021-06-09T04:51:01+5:30
अंचळ येथील शेतात जाणारा मुख्य रस्ता तसेच अंचळ ते मादणी जोडणारा हा रस्ता ११ वर्षांपूर्वी कच्चा भराव टाकून तसेच ...
अंचळ येथील शेतात जाणारा मुख्य रस्ता तसेच अंचळ ते मादणी जोडणारा हा रस्ता ११ वर्षांपूर्वी कच्चा भराव टाकून तसेच शेतकऱ्यांनी केलेले अतिक्रमण काढून तत्कालीन तहसीलदार लोणारकर यांनी केला होता. रोजगार हमी योजनेतून ३ कि.मी.पैकी १ कि.मी काम बाकी होते. दरम्यान, त्यांची बदली झाली व रस्ता बंद पडला. तेव्हापासून दरवर्षी शेतकरी वर्गणी करून मुरुम दगड टाकून रस्ता पेरणीसाठी योग्य बनवितात. पेरणी झाल्यानंतर शेतमाल घरी आणतात. पुन्हा रस्ता नादुरुस्त हाेताे. असा क्रम शेतकरी दरवर्षी करतात. ग्रामपंचायत रस्तावरून सतत तीन वर्षांपासून हा रस्ता पक्का खडीकरण करून देण्यासाठी कागदोपत्री पाठपुरावा करणे सुरू आहे. परंतु या रस्त्याला ग्रा. मा. नंबर मिळाल्याशिवाय रस्ता होणार नाही, असे उत्तर मिळत आहे. म्हणून अंचळवासीयांनी दरवर्षी २ ते ३ लाख वर्गणी करून रस्ता दुरुस्ती सुरू आहे. आजरोजी रस्त्याची अवस्था बिकट आहे दोन्ही बाजूच्या काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून रस्ता अरुंद करणे सुरू आहे. अंचळ ते मादणी ४३ फुटांचा हा रस्ता असून, जास्तीत जास्त ठिकाणी २० फुटही रस्ता राहिलेला नाही . या रस्त्याने गावालील ७५ टक्के शेतकऱ्यांना जावे लागते. जमीन काळी कसदार असल्याने रस्त्यावर पाणी पडल्यानंतर चिखल तयार होतो व त्यामध्ये ट्रॅक्टर फसतात. शेतकऱ्यांना खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. तरी संबंधित विभागाने या रस्त्याकडे जातीने लक्ष देऊन ज्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले त्यांंच्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.