शेतकरी आक्रमक; जिल्ह्यात ‘रास्ता रोको’
By admin | Published: June 6, 2017 01:14 AM2017-06-06T01:14:55+5:302017-06-06T01:18:04+5:30
अकोला-हैदराबाद महामार्गावरील वाहतूक ठप्प : मानोरा येथे सर्वपक्षीय नेते एकवटले
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपात सहभागी होत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व विविध संघटनांनी सोमवारी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले.
रिसोड येथे लोणी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकरी संपाच्या समर्थनार्थ रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यात आली. शेलुबाजार येथील कृषी सेवा केंद्र संचालकांनी दुकाने बंद ठेवून या संपाला पाठिंबा दर्शविला. शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज माफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शिरपूर येथे आंदोलन करण्यात आले. रिसोड तालुक्यातील कुकसा फाटा येथे काँग्रेस पदाधिकारी व शेतकऱ्यांनी रास्ता रोको करून सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध नोंदविला. मानोरा येथे सर्वपक्षीय नेत्यांनी व शेतकऱ्यांतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मालेगाव येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी तर मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा फाटा येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. कारंजा व मानोरा येथे बंद पाळण्यात आला. मानोरा येथे बंदला १०० टक्के प्रतिसाद लाभला. रिसोड तालुक्यातील मोप व मांगुळझनक तसेच कारंजा तालुक्यातील धनज बु. येथे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाणे बंद ठेवून शेतकरी संपाला पाठिंबा दर्शविला. वाशिम तालुक्यातील टणका, सोनगव्हाण येथील शेतकऱ्यांचा बेमुदत संप सुरूच आहे.
मालेगावात रास्ता रोको
मालेगाव : मालेगावात शेलू फाट्यावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. यामुळे अकोला-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक जाम झाली होती. यावेळी गजानन बोरचाटे, विजय शेंडगे, भगवान बोरकर, दीपक शिंदे, प्रकाश बोरजे, मोहन देवळे, अरविंद जाधव, मधुकर राठोड, हरीभाऊ लहाने, केंद्रे यांच्यासह शेतकऱ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती. यावेळी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविण्यात आला.
शिरपूर येथे गांधीगिरी मार्गाने आंदोलन
शिरपूर जैन : शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिरपूर येथे गांधीगिरी मार्गाने शेतकऱ्यांनी आंदोलन केले. शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज माफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वात शिरपूर येथे ५ जून रोजी सकाळी १०.३० वाजता आंदोलन करण्यात आले. यावेळी हनुमानाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक तर जनावरांना भाजीपाला खावू घातला. शासनाविरोधात घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला. यावेळी शिरपूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
मानोरा येथे सर्वपक्षीय एकवटले
मानोरा : शेतक ऱ्यांना कर्जमुक्ती व्हावी त्यासोबतच शेतमालाला भाव मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी राज्यभर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सोमवार ५ रोजी शहरातल्या दिग्रस चौकात सर्वपक्षीयांतर्फे रास्ता रोको करण्यात आला. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून व्यापारीवर्गानेसुद्धा आपली दुकाने बंद ठेवली होती.
दिग्रस चौकात तिन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. शासन विरोधात विविध घोषणा दिल्या. आंदोलनात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे पदाधिकारी सामील झाले होते. यावेळी माजी जि.प.अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले, माजी वीज मंडळ सदस्य अनिल राठोड, माजी जि.प. सदस्य डॉ.सुभाष राठोड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इफ्तेखार पटेल, जिल्हा बँकेचे संचालक उमेश ठाकरे, जि.प.सदस्य सचिन रोकडे, जि.प.सदस्य अनिता राऊत, बाजार समितीचे सभापती डॉ.संजय रोठे, मानोरा पं.स. सभापती धनश्री राठोड, पं.स. उपसभापती रजनी गावंडे, खरेदी -विक्री संघाचे अध्यक्ष सुरेंद्र देशमुख, यांच्यासह शेतकरी, पदाधिकारी पं.स. सदस्य आदींची उपस्थिती होती.
कुकसा येथे रास्ता रोको
रिसोड: तालुक्यातील कुकसा येथे काँग्रेसचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी काँग्रेस मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. संतोष बाजड, नारायण बाजड, नवनाथ महाराज, विष्णू बाजड विजय नवघरे, दीपक बाजड, दीपक वालुकर, अनिल वानखेडे, अनिल बाजड, दत्ता बाजड, लोडजी बाजड, शंकर बाजड, हरिभाऊ जुनघरे, पांडुजी वानखेडे, रघु वानखेडे, रूपराव वानखेडे, गणेश बाजड, विठ्ठल बाजड, विजय बाजड, रामेश्वर बाजड, किशोर बाजड, अमोल बाजड, अरुण बाजड, राजू इडोळे, विश्वास बाजड, मनोज बाजड, से. समद से. महबूब, मनीष बाजड, गजानन सुरुसे, कैलास बाजड, सतीश गाभने, गजानन गवळी, गजानन रेलकर, प्रताप बाजड, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. सुमारे एक तास रास्ता रोको करण्यात आला. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.