अमरावती विभागात गळीताकडे शेतकऱ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 03:08 PM2019-01-05T15:08:54+5:302019-01-05T15:09:01+5:30
वाशिम: अमरावती विभागातील शेतकरी रब्बी हंगामातील गळीताबाबत उदासीन असून, यंदा सरासरी १९९१ हेक्टर क्षेत्रावर गळीताची पेरणी अपेक्षीत असताना पाचही जिल्ह्यात मिळून केवळ १७७ हेक्टर क्षेत्रावर गळीत पिके अर्थात तेलबियांची पेरणी झाली आहे.
वाशिम: अमरावती विभागातील शेतकरी रब्बी हंगामातील गळीताबाबत उदासीन असून, यंदा सरासरी १९९१ हेक्टर क्षेत्रावर गळीताची पेरणी अपेक्षीत असताना पाचही जिल्ह्यात मिळून केवळ १७७ हेक्टर क्षेत्रावर गळीत पिके अर्थात तेलबियांची पेरणी झाली आहे. नियोजित सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ९ टक्के आहे. वन्यप्राण्यांचा उपद्रव, तसेच नगण्य भाव यामुळे या पिकांकडे शेतकºयांनी पाठ केली आहे.
अमरावती विभागात पूर्वी सूर्यफुल, करडई, तीळ, कराळ, हिवाळी भुईमुगाचे क्षेत्र लक्षणीय होते; परंतु गत काही वर्षांत या पिकांच्या पेºयात सतत घट होत असून, गेल्या पाच, सहा वर्षांत या पिकांकडे शेतकºयांनी पूर्णपणे पाठच केल्याचे दिसत आहे. सुर्यफुल, तिळ या पिकांना फारशी पाण्याची गरज नसते. तथापि, विपरित वातावरणाचा फटका या पिकांना बसतो, तसेच वन्यप्राणी आणि पक्ष्यांकडून या पिकांची मोठी नासाडी होते. त्यातच उत्पादन झाल्यानंतर बाजारात अपेक्षीत दर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी या पिकाकडे पाठ करीत आहेत. गतवर्षी अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात मिळून ८६०० हेक्टर क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी कृषी विभागाने नियोजित केली होती. प्रत्यक्षात केवळ २१०८ हेक्टर क्षेत्रावर या पिकांची पेरणी झाली होती. सरासरीच्या तुलनेत पेरणीचे प्रमाण केवळ २५ टक्के होते. यंदा विभागात समाधानकारक पाऊस पडला असताना केवळ १९९१ क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी अपेक्षीत होती. प्रत्यक्षात केवळ १७७ हेक्टर क्षेत्रावर या पिकांची पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ९ टक्के आहे. विशेष म्हणजे जवस आणि तीळ या पिकांचे क्षेत्र निरंक आहे. यंदा बुलडाणा जिल्ह्यात ७१ हेक्टर, अकोला जिल्ह्यात ४ हेक्टर, वाशिम जिल्ह्यात ३९ हेक्टर, तर यवतमाळ जिल्ह्यात ६३ हेक्टर क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी झाली आहे.
अमरावती जिल्हा निरंक
विभागातील पाच जिल्हे मिळून एकूण १७७ हेक्टर क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी झाली असली तरी, अमरावती जिल्ह्यात यंदा एका हेक्टर क्षेत्रातही गळीत पिकांची पेरणी झालेली नाही. गतवर्षी अमरावती जिल्ह्यात ४२०० हेक्टर क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी अपेक्षीत असताना केवळ ९४५ हेक्टर क्षेत्रावर या पिकांची पेरणी झाली होती, हे येथे उल्लेखनीय. गळीत पिकांच्या सतत घटणाºया पेºयामुळे शेतकरी या पिकांबाबत उदासीन असल्याचे स्पष्ट होत आहे.