गुरा-ढोरांसह शेतकऱ्यांचा मोर्चा धडकला मानोरा तहसिल कार्यालयावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 02:33 PM2018-03-22T14:33:11+5:302018-03-22T14:33:11+5:30
मानोरा : विविध मागण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गुरा-ढोरांसह शेतकऱ्यांचा मोर्चा मानोरा तहसिल कार्यालयावर २२ मार्च रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास काढण्यात आला.
मानोरा : विविध मागण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गुरा-ढोरांसह शेतकऱ्यांचा मोर्चा मानोरा तहसिल कार्यालयावर २२ मार्च रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास काढण्यात आला. जिल्ह्याची पैसेवारी ५० पेक्षा कमी असतानाही अद्याप दुष्काळी उपाययोजना राबविण्यात येत नसल्याने यावेळी रोष व्यक्त करण्यात आला.
मानोरा तालुक्यातील रुई, उज्वलनगर, ढोणी, पाळोदी परिसराती विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. गुरांसाठी चारा, पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे पशुपालकांचे हाल होत आहेत. पशुपालक शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्याकडे शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल मोर्चेकऱ्यांनी रोष व्यक्त केला. जागतिक जल दिनी अर्थात २२ मार्चला राकाँ पदाधिकारी व शेतकºयांनी गुरा-ढोरांसह मोर्चा काढून पाणी पुरवठ्याची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी लावून धरली. शेकडो शेतकरी गुराढोरांसह भर उन्हात दुपारी १ वाजतादरम्यान मानोरा तहसिल कार्यालयावर धडकले. २०१७ मध्ये वाशिम जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली नाही. शेतमालाच्या उत्पादनात प्रचंड घट आली. यामुळे जिल्ह्यातील ७९३ गावातील अंतिम पैसेवारी ४७ पैसे जाहीर झालेली आहे. मात्र, अद्याप दुष्काळी परिस्थिती निवारणार्थ कोणतीच उपाययोजना शासनाने राबविली नाही. याकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजु गुल्हाने यांच्या मार्गदर्शनात जि.प.सदस्य सचिन कोरडे पाटील व रेखा पडवाल यांच्या नेतृत्वात मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले.