खरीपासाठी शेतकऱ्यांची राखीव शेतमाल विक्रीची घाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 04:37 PM2019-06-04T16:37:45+5:302019-06-04T16:40:07+5:30
बियाणे, खते खरेदी करता यावीत म्हणून शेतकºयांनी शिल्लक ठेवलेला शेतमाल विकण्याची लगबग सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: खरीपाच्या पेरणीची तयारी शेतकरी करीत आहेत. दमदार पावसानंतर पेरणीला सुरूवात होणार असून, यासाठी बियाणे, खते खरेदी करता यावीत म्हणून शेतकºयांनी शिल्लक ठेवलेला शेतमाल विकण्याची लगबग सुरू केली आहे. त्यात शेतमालाच्या दरात तेजी आल्याने शेतकºयांना थोडा फायदाही होत आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील जिल्ह्यातील बाजार समित्यांत शेतमालाची आवक वाढल्याचे दिसत आहे.
गतवर्षी जिल्ह्यातील शेतकºयांना पुन्हा निसर्गाच्या अनियमिततेचा फटका बसला. सुरुवातीच्या चांगल्या पावसानंतर पडलेला खंड, तर आॅगस्टमधील अतिवृष्टी आणि पावसाची घटलेली सरासरी यामुळे सर्वच पिकांच्या उत्पादनावर काही प्रमाणात परिणाम झाला. त्यात हंगाम संपेपर्यंतही बाजारात शेतमालास अपेक्षीत भाव मिळालेच नाहीत. काही शेतकºयांनी घेणीदेणी, कर्ज, तसेच इतर आवश्यक कामांसाठी शेतमाल विकलाही; परंतु खरीप हंगामाच्या तयारीत पैशांची अडचण भासू नये म्हणून काही शेतकºयांनी शेतमाल घरी साठवूनही ठेवला होता. आता यंदाच्या हंगामासाठी जिल्ह्यात १५०० कोटींच्या पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट असताना बँका पीक कर्ज वितरणात उदासीन असून, अद्याप २० टक्केही कर्जाचे वितरण जिल्ह्यात झालेले नाही. त्यामुळे अडचणीत आलेले शेतकरी घरात ठेवलेला शेतमाल विकून बियाणे, खते खरेदी करीत आहेत. यामुळे बाजारात शेतमालाची आवक वाढली असून, शेतमालाच्या दरातही थोडी तेजी आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांत तुरीला सरासरी प्रति क्विंटल ६ हजार, सोयाबीनला सरासरी ३७००, मुगाला सरासरी ५६००, उडिदाला ४५००, तर हरभºयाला ४४०० रुपये प्रति क्विंटलपर्यंतचे दर मिळत आहेत. अर्थात बियाणे विक्रीच्या वेळेतील ही तेजी असली तरी गरजवंत शेतकºयांना त्याचा फायदा होत असल्याने बाजार समित्यांत शेतमालाची आवक वाढल्याचे चित्रही दिसत आहे.