पंचनाम्यासाठी शेतकरी आक्रमक; माहुली, बेलोरा येथे रास्ता रोको

By संदीप वानखेडे | Published: July 23, 2023 02:23 PM2023-07-23T14:23:10+5:302023-07-23T14:23:19+5:30

मानोरा तालुक्यात गत तीन दिवसांपासून संततधार पाऊस झाल्याने शेतात पाणीच पाणी दिसून येते.

Farmers Aggressive for Panchnama; Road stop at Mahuli, Belora | पंचनाम्यासाठी शेतकरी आक्रमक; माहुली, बेलोरा येथे रास्ता रोको

पंचनाम्यासाठी शेतकरी आक्रमक; माहुली, बेलोरा येथे रास्ता रोको

googlenewsNext

वाशिम : सुरूवातीला मान्सून लांबल्याने पेरणीस विलंब झाला आणि आता अतिवृष्टीमुळे पिकांसह शेतीचे अतोनात नुकसान झाले. दुसरीकडे २३ जुलै रोजी सकाळी १० वाजेपर्यंतही नुकसानग्रस्त भागात पंचनाम्यासाठी अधिकारी, कर्मचारी आले नसल्याचे पाहून मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत माहुली व बेलोरा येथे रास्ता रोको आंदोलन केले.

मानोरा तालुक्यात गत तीन दिवसांपासून संततधार पाऊस झाल्याने शेतात पाणीच पाणी दिसून येते. २२ जुलै रोजी अतिवृष्टी झाल्याने नदी, नाल्याला पूर आला. पुराचे पाणी नदी-नाल्या काठच्या शेतात गेल्याने जमिन खरडून गेली, पिके जमिनदोस्त झाली, काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले तर काही नागरिकांच्या घराच्या भिंती पडल्या. नैसर्गिक आपत्तीत सापडल्याने २३ जुलैला सकाळपासूनच प्रशासकीय यंत्रणेकडून पंचनाम्याला सुरूवात होईल, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून होते. मात्र, सकाळी १० वाजेपर्यंतही तालुका प्रशासनातील कोणताही अधिकारी पाहणी करण्यासाठी आला नाही. अगोदरच नैसर्गिक आपत्तीमुळे होत्याचे नव्हते झाले आणि प्रशासकीय यंत्रणेकडूनही पंचनाम्यास विलंब होत असल्याचे पाहून मानोरा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा संयमाचा बांध फुटला.

माहुली परिसरातील शेतकऱ्यांनी माहुली येथे तर बेलोरा परिसरातील शेतकऱ्यांनी बेलोरा येथे रास्ता रोको आंदोलन केले. काही वेळ दिग्रस ते मानोरा रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहून तातडीने प्रशासन जागे झाले आणि महसूल व कृषी विभागातील अधिकारी माहुली व बेलोरा येथे पोहचले. नायब तहसीलदार जी.एम.राठोड, तालुका कृषी अधिकारी उमेश राठोड, सहायक पोलीस निरीक्षक महेश कुचेकर, मंडळ अधिकारी, कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक आदी हजर झाले. पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने सकाळी ११:३० वाजदरम्यान रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

Web Title: Farmers Aggressive for Panchnama; Road stop at Mahuli, Belora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.