हमीदराअभावी शेतकरी संतप्त
By admin | Published: February 5, 2017 02:13 AM2017-02-05T02:13:22+5:302017-02-05T02:13:22+5:30
कारंजातील स्थिती; सभापतीचा शेतमाल तारणाचा सल्ला.
कारंजा लाड, दि. ४- कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची खरेदी हमीभावाने होत नसल्याने तूर उत्पादक शेतकर्यात संतापाची लाट उसळली आहे. याच कारणामुळे शेतकर्यांनी ४ फेब्रुवारी रोजी कृषी बाजारात काही काळ तुरीचा लिलाव बंद पाडला.
शेतकर्यांचा शेतमाल बाजारात आला, की भाव पडणे काही नवीन नाही; परंतु त्यातही खरेदी करणारे व्यापारी त्याचा फायदा घेऊन शेतमाल भाव पाडून खरेदी करतात. संतप्त झालेल्या शेतकर्यांनी आपल्या व्यथा मांडण्यासाठी थेट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीच्या दालनात धाव घेतली. यावेळी सभापती प्रकाश डहाके यांनी संतप्त शेतकर्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. शासनाने बाजार समितीला तूर हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात येऊ नये, असे पत्र दिले; परंतु त्या पत्रात हमीभाव ४६00 की ५0५0 याबद्दल स्पष्ट उल्लेख नाही. दरम्यान, तुरीचे भाव कमी आहेत हे सभापतींनी मान्य केले; परंतु व्यापार्यांना जास्त भावाने खरेदी करण्यास आपण सांगू शकत नाही. शेतकर्यांनी आपला माल बाजार समितीकडे तारण ठेवून त्यावर ७५ टक्के रकमेची उचल करून आपला व्यवहार करावा व भविष्यात भाव वाढल्यानंतर तूर विकावी, असा सल्ला सभापती प्रकाश डहाके यांनी यावेळी संतप्त शेतकर्यांना दिला.