कर्जमुक्तीसाठी थेट मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे अर्ज!
By admin | Published: May 30, 2017 01:37 AM2017-05-30T01:37:28+5:302017-05-30T01:37:28+5:30
शेतकऱ्यांकडून अर्ज भरण्यास सुरुवात : ‘मी कर्जमुक्त होणारच!’ साठी शिवसेनेचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील शेतकरी कर्जातून मुक्त होण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘मी कर्जमुक्त होणारच!’ अशा आशयाचे अर्ज शेतकऱ्यांकडून भरून घेण्यात येत आहेत. हे अर्ज थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत. शिवसेना तालुका शाखेच्यावतीनेही जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून हे अर्ज भरून घेण्यात येत आहेत.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला पाहिजे तसा भाव नाही. शेतकऱ्यांची यावर्षी तूर पेरली. मात्र तुरीलाही पाहिजे, तसा भाव नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्ग शेतकऱ्यांची परीक्षा पाहतोय. कुठे पाऊस आहे कुठे नाही, कुठे गारपिटीने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतकरी कर्ज घेऊन शेती करतो. मात्र, शेतीतही पाहिजे तसे पिकत नाही. कर्जवसुलीसाठी बँकेची पठाणी वसुली सुरू आहे. त्यांना जप्तीच्या नोटिस दिल्या जात आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला असून, या शेतकऱ्यांच्या मनाला उभारी देऊन त्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यासाठी शिवसेनेच्यावतीने ‘मी कर्जमुक्त होणारच!’ अशा आशयाचे अर्ज वाशिम तालुक्यातील शेतकऱ्यांकडून भरून घेण्यात येत असून, उपतालुकाप्रमुख, शाखाप्रमुख, सर्कलप्रमुख, उपसर्कलप्रमुख यांच्याकडे हे अर्ज उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी हे अर्ज भरून द्यावे, असे आवाहन शिवसेनेच्यावतीने करण्यात आले आहे.
यासंदर्भातील अधिक माहितीकरिता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे संपर्क करून यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. सदर अर्ज मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख राजेश पाटील, उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख, तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, बंडू शिंदे यांनी दिली.
३१ मेनंतर तूर खरेदी सुरू न ठेवल्यास आंदोलन
नाफेडमार्फत तूर खरेदीची मुदत ३१ मे पर्यंत आहे. मात्र, ३१ मे पर्यंत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी ३१ मे नंतरही सुरू ठेवण्याची मागणी शिवसेनेने केली असून, शेतकऱ्यांकडून तूर खरेदी न केल्यास शिवसेनेच्यावतीने खासदार भावना गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्यावतीने दिला आहे. शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा उपनिबंधक व जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या पत्रानुसार वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आतापर्यंत १५ मे पासून ६२०० कास्तकारांना टोकन दिले आहे. उपबाजार अनसिंग येथे १६६२ कास्तकारांना टोकन दिले आहे, असे एकूण ७८०० कास्तकारांना टोकन वाटप केले आहे. त्यापैकी आजपर्यंत ५६२ कास्तकारांच्या ७८०० क्विंटल मालाची मोजणी झाली आहे व ३१ तारखेपर्यंत अंदाजे १००० कास्तकारांची नोंदणी होऊ शकते. त्यामुळे सदर नोंदणी झालेला माल येत्या ३१ मे पर्यंत मोजणी होऊ शकत नसल्यामुळे बाजार समितीच्यावतीने नोंदणी झालेला माल मोजून घेण्याकरिता ३१ मे नंतरही नाफेड तूर खरेदी केंद्र चालू ठेवावे. अजूनही अंदाजे एक ते सव्वा लाख क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. तसेच मानोरा तालुक्यात नाफेड अंतर्गत तूर खरेदी केंद्र नसून, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना आपली तूर मंगरुळपीर, कारंजा किंवा वाशिम येथे विक्रीसाठी आणावी लागत आहे. तरी मानोरा येथील शेतक ऱ्यांसाठी शासनाने विशेष अनुदान देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. अन्यथा शिवसेनेच्यावतीने शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख राजेश पाटील, उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख, डॉ. चंद्रशेखर देशमुख, भागवतराव गवळी, दिनेश राठोड, तालुका प्रमुख रामदास मते पाटील, महादेवराव ठाकरे, संतोष सुरडकर, अनिल पाटील राऊत, रवी पवार, नरहरी कडू, शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, संतोष जोशी, अरुण मगर, विवेक नाकाडे, राजू देशमुख, गणेश बाबरे, उपशहरप्रमुख दिलीप काष्टे, गणेश पवार, नामदेव हजारे, उपतालुका प्रमुख विजय खानझोडे, विठ्ठल चौधरी, गजानन इढोळे, नारायण मानदार, गजानन जैताडे, रामदास ठाकरे, बंडू कदम, बंडू शिंदे आदींनी दिला आहे.