पावसाचा हाहाकार, शेतकरी पुरता बेजार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:47 AM2021-09-23T04:47:50+5:302021-09-23T04:47:50+5:30
वाशिम : जिल्हाभरात सतत दोन दिवस पावसाने अक्षरश: हाहाकार माजविला. यामुळे विशेषत: सोयाबीनची प्रचंड नासाडी झाली असून, खरिपातील इतरही ...
वाशिम : जिल्हाभरात सतत दोन दिवस पावसाने अक्षरश: हाहाकार माजविला. यामुळे विशेषत: सोयाबीनची प्रचंड नासाडी झाली असून, खरिपातील इतरही शेकडो एकरांवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. यामुळे शेतकरी पुरते बेजार झाले असून, पुन्हा एकवेळ नुकसानीचे पंचनामे होण्याची प्रतीक्षा आणि शासनाकडून मिळणाऱ्या भरपाईची आस त्यांना लागली आहे.
जिल्ह्यात चार लाखांपेक्षा अधिक हेक्टर शेतजमिनीवर यंदा खरिपातील पिकांची पेरणी करण्यात आली. त्यात तब्बल तीन लाखांपेक्षा अधिक हेक्टर जमीन एकट्या सोयाबीनने व्यापलेली आहे. यंदा सुरुवातीपासूनच पोषक वातावरण आणि अधूनमधून कोसळणाऱ्या पावसामुळे सोयाबीनची वाढ अपेक्षेनुरूप झाली. विशेषत: या पिकांवर यंदा कीड रोगांचा अधिक प्रादुर्भाव न झाल्याने विक्रमी उत्पादन हाती पडण्याची आशा शेतकऱ्यांना लागून होती. अवघ्या काहीच दिवसांत सोयाबीनची काढणी प्रक्रिया सुरू होणार होती; मात्र १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतशिवारांमध्ये पाणीच पाणी साचून सोयाबीनची प्रचंड हानी झाली आहे. शेतात तब्बल गुडघाभर पाणी साचून असल्याने सोयाबीनची काढणी नेमकी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. यापुढेही काही दिवस जोरदार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. कृषी विभागाने तातडीची पावले उचलत नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करावे व शेतकऱ्यांना शासनस्तरावरून आर्थिक साहाय्य मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.
.................
कोट :
सोनखास शिवारात दरवर्षीप्रमाणे यंदाही अधिकांश शेतजमिनीवर सोयाबीनचा पेरा झालेला आहे. अनुकूल वातावरण आणि समाधानकारक पर्जन्यमानामुळे सोयाबीन चांगलेच बहरले होते; मात्र गत दोन ते तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीने काढणीला आलेल्या सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी आहे.
- उकंडा गोरे, शेतकरी, सोनखास, ता. वाशिम